ढाब्यावर FDAचा मोठा दणका! ‘शेळके मामा’चा अन्न परवाना निलंबित; अस्वच्छता, झुरळे आणि व्हेज-नॉनव्हेज सरमिसळीवर कारवाई
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १० :- खुलताबाद तालुक्यातील शेरनापूर येथील प्रसिद्ध **‘शेळके मामा ढाबा रेस्टॉरंट’**वर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कठोर कारवाई केली आहे. ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्यानंतर या आस्थापनेचा अन्न परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी प्र. श. कुचेकर यांनी ढाब्याची तपासणी केल्यानंतर अन्नसुरक्षा नियमांशी संबंधित अनेक गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या होत्या. त्यानंतर संबंधित व्यावसायिकाला आवश्यक सुधारणा करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, त्यानंतर झालेल्या फेरतपासणीतही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.
तपासणीदरम्यान स्वयंपाकघरात अस्वच्छता असल्याचे, झुरळांचा वावर असल्याचे तसेच कीटकांना रोखण्यासाठी आवश्यक जाळ्यांची व्यवस्था नसल्याचे आढळून आले. व्हेज आणि नॉनव्हेज खाद्यपदार्थांचे स्वतंत्रपणे व सुरक्षित पद्धतीने विलगीकरण करण्यात येत नसल्याचाही मुद्दा समोर आला.
याशिवाय अन्न हाताळणीच्या परिसरात पाणी साचलेले असल्याचे, ड्रेनेज व्यवस्थेची स्थिती समाधानकारक नसल्याचे तसेच स्वच्छतेच्या निकषांचे पालन होत नसल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले.
तपासणीमध्ये खाद्यपदार्थांच्या प्रयोगशाळा चाचण्यांशी संबंधित आवश्यक नोंदी उपलब्ध नसणे, फूडग्रेड पॅकेजिंगसाठी आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता नसणे आणि कचऱ्याची योग्य व वेळेवर विल्हेवाट न लावणे, अशा त्रुटीही आढळल्या.
अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांकडूनही आवश्यक सुरक्षात्मक नियमांचे पालन होत नसल्याचे समोर आले. काही कर्मचाऱ्यांकडून अॅप्रन, हातमोजे, हेड गियर आणि शू कव्हरचा वापर केला जात नसल्याचे तपासणीत निदर्शनास आले.
या सर्व बाबींची गंभीर दखल घेत सहायक आयुक्त (अन्न) द. वि. पाटील यांनी जनहिताच्या दृष्टीने संबंधित ढाब्याचा अन्न परवाना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
निलंबनाच्या कालावधीत संबंधित आस्थापनाला अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, विक्री अथवा वितरण करण्यास मनाई करण्यात आली आहे. निलंबन आदेशाचे उल्लंघन करून व्यवसाय सुरू ठेवल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला आहे.