१५ हजार विद्यार्थ्यांच्या रंगरेषांतून रस्ते सुरक्षेचा जागर; ग्रामीण पोलिसांच्या चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

१५ हजार विद्यार्थ्यांच्या रंगरेषांतून रस्ते सुरक्षेचा जागर; ग्रामीण पोलिसांच्या चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
१५ हजार विद्यार्थ्यांच्या रंगरेषांतून रस्ते सुरक्षेचा जागर; ग्रामीण पोलिसांच्या चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. १ :- रस्ते अपघातांमुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी आणि वाहतूक नियमांविषयी व्यापक जनजागृती करण्याच्या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी आयोजित केलेल्या भव्य चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील जिल्हा परिषद माध्यमिक शाळांमधून तब्बल १५ हजार १२३ विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकृतींतून रस्ता सुरक्षेचा प्रभावी संदेश दिला.

पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या संकल्पनेतून ग्रामीण पोलिसांकडून ‘रस्ते सुरक्षा अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा संदेश विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घराघरात पोहोचावा आणि समाजातील विविध घटकांमध्ये वाहतूक सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने १ सप्टेंबर रोजी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेसाठी ‘वाहतूक नियम पाळूया, अपघात टाळूया’ आणि ‘हेल्मेट आणि सीट बेल्ट : जीवांच्या सुरक्षेचे कवच’ हे दोन विषय देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी वाहतूक सिग्नलचे पालन, वेगमर्यादेचे भान, सुरक्षित वाहनचालकाची जबाबदारी, पादचाऱ्यांची सुरक्षा आणि वाहतूक शिस्त यासारख्या विविध मुद्द्यांचे प्रभावी चित्रण केले.

हेल्मेट आणि सीट बेल्टच्या वापराचे महत्त्वही विद्यार्थ्यांनी आपल्या चित्रांमधून अधोरेखित केले. दुचाकी चालविताना हेल्मेट वापरणे तसेच चारचाकी वाहनांमध्ये सीट बेल्ट लावणे अपघाताच्या वेळी जीव वाचविण्यासाठी किती महत्त्वाचे आहे, हा संदेश कलाकृतींच्या माध्यमातून देण्यात आला.

लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षा, वाहतूक शिस्त आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीव निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. विद्यार्थी हे कुटुंबातील प्रभावी जनजागृतीचे माध्यम असल्याने त्यांच्यामार्फत वाहतूक नियमांचे महत्त्व पालक व कुटुंबीयांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास ग्रामीण पोलिसांनी व्यक्त केला आहे.

रस्ता सुरक्षा ही केवळ नियमांचे पालन करण्यापुरती मर्यादित नसून प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी असल्याचा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला. हेल्मेट व सीट बेल्टचा वापर, वाहतूक सिग्नलचे पालन, वेगावर नियंत्रण, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे, पादचाऱ्यांना सुरक्षित मार्ग देणे आणि मद्यप्राशन करून वाहन न चालविणे यांसारख्या बाबींचे पालन केल्यास अपघात व जीवितहानी कमी होण्यास मदत होऊ शकते, असे चित्रांमधून विद्यार्थ्यांनी मांडले.

स्पर्धेतील कलाकृतींचे २ सप्टेंबर रोजी परीक्षण करण्यात येणार असून उत्कृष्ट कलाकृतींची निवड केली जाणार आहे. प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी व प्रभारी अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे.

तसेच ७ सप्टेंबर रोजी २३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील प्रथम क्रमांकाच्या २३ विद्यार्थ्यांचा पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या हस्ते प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात येणार आहे. यातील निवडक उत्कृष्ट चित्रे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दर्शनी भागात प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

‘रस्ते सुरक्षा अभियान’अंतर्गत जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यावर ग्रामीण पोलिसांचा भर आहे. तब्बल १५ हजार १२३ विद्यार्थ्यांच्या सहभागातून ‘वाहतूक नियमांचे पालन करा, स्वतःचा आणि इतरांचा जीव सुरक्षित ठेवा’ हा संदेश समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचल्याचे या उपक्रमातून स्पष्ट झाले आहे.