शिक्षक दिनी विद्यार्थ्यांनी सांभाळली अध्यापनाची धुरा; एच. जे. थिम कॉलेजमध्ये उत्साहात कार्यक्रम
महाराष्ट्र वाणी
जळगाव दि ६ :- इक्रा शिक्षण संस्था संचलित एच. जे. थिम कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, मेहरून येथे शिक्षक दिन उत्साहपूर्ण आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी विद्यार्थ्यांनीच शिक्षकांची भूमिका निभावत महाविद्यालयातील अध्यापनाची जबाबदारी सांभाळली.
सकाळी ८.३० वाजल्यापासून विद्यार्थ्यांनी विविध विषयांचे वर्ग घेतले. प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेल्या अध्यापनाचे निरीक्षण केले आणि उत्कृष्टपणे जबाबदारी पार पाडणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यानंतर महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात ‘तिलावत-ए-कलाम-ए-पाक’ने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वकार शेख होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. तनवीर खान, उपप्राचार्य डॉ. अंजली कुलकर्णी, प्रा. डॉ. चांद खान, डॉ. इरफान शेख, प्रा. डॉ. साजिद मलिक, प्रा. डॉ. युसुफ पटेल, डॉ. हाफिज शेख, प्रा. डॉ. फिरदौस आणि प्रा. डॉ. आयेशा बाशित आदी मान्यवर उपस्थित होते.
शिक्षकांच्या भूमिकेतून अध्यापन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी यावेळी आपले अनुभव व्यक्त केले. शिक्षक विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी किती मेहनत घेतात आणि अध्यापनाची जबाबदारी किती महत्त्वपूर्ण असते, याची जाणीव या उपक्रमातून झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
यानंतर ‘बझ्म-ए-उर्दू अदब’च्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांना पुष्पगुच्छ अर्पण करून त्यांचा सत्कार केला. प्रा. डॉ. युसुफ पटेल, प्रा. डॉ. फिरदौस शेख आणि मौलाना मुजम्मिल काझी यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व अधोरेखित करत आपले विचार व्यक्त केले. विशेष म्हणजे कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही विद्यार्थ्यांनीच केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. वकार शेख यांनी शिक्षकाच्या कार्याचे महत्त्व स्पष्ट केले. पैगंबर मोहम्मद (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांना शिक्षक म्हणून पाठविण्यात आल्याचा संदर्भ देत त्यांनी शिक्षक हे विद्यादानासारखे पवित्र आणि समाज घडविणारे कार्य करीत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानण्यात आले. अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता झाली.