पाणी वाया घालविणाऱ्यांना आता दणका! पैठण गेट परिसरात नागरिकाला थेट १० हजारांचा दंड
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २१ :- शहरातील पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांविरोधात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने आता कठोर भूमिका घेतली आहे. पाणी वाया घालवणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देत महापालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे. पैठण गेट परिसरात घरातील टाकी भरल्यानंतरही नळाचे पाणी रस्त्यावर वाहू देणाऱ्या नागरिकाला तब्बल १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
आज सकाळी महापालिका आयुक्त अमोल येडगे आणि उपआयुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्या निदर्शनास पैठण गेट परिसरात पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याचा प्रकार आला.
संबंधित नागरिक निलेश देशमुख यांच्या घरातील पाण्याची टाकी भरल्यानंतरही नळ बंद करण्यात आला नव्हता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहून जात होते. हा प्रकार लक्षात येताच आयुक्त अमोल येडगे यांनी तातडीने दखल घेत १० हजार रुपयांचा दंड आकारण्याचे निर्देश दिले.
पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा!
पाणी हे अत्यंत मौल्यवान नैसर्गिक संसाधन असून, शहरातील पाणीपुरवठ्याची परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे. टाकी भरल्यानंतर नळ सुरू ठेवणे, ओव्हरफ्लोचे पाणी रस्त्यावर सोडणे, रस्ते किंवा परिसर धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरणे, वाहन धुताना मोठ्या प्रमाणात पाणी वाया घालवणे तसेच नळ आणि पाइपलाइनमधील गळतीकडे दुर्लक्ष करणे, असे प्रकार टाळण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
“पाणी रस्त्यावर सोडले तर दंड होणारच!”
“शहरात कोणत्याही नागरिकाकडून पाणी रस्त्यावर सोडले जात असल्याचे किंवा कोणत्याही स्वरूपात पाण्याचा अपव्यय होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कडक दंडात्मक कारवाई करण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा आयुक्त अमोल येडगे यांनी दिला आहे.
महापालिकेच्या या कारवाईमुळे आता पाणी वाया घालवणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, शहरातील नागरिकांनीही पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याची गरज आहे. आपल्या घरातील टाकी, नळ आणि पाइपलाइनमध्ये गळती असल्यास ती तातडीने दुरुस्त करावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
पाणी वाचवा… शहर वाचवा!
महापालिकेच्या कारवाईनंतर आता पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर पुढेही अशीच कडक कारवाई होणार का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.