बिडकीनमध्ये ईद-ए-मिलादुन्नबीचा जुलूस उत्साहात; शांततेत पार पडला धार्मिक सोहळा
महाराष्ट्र वाणी
बिडकीन, दि. २६ (प्रतिनिधी) :- ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने बिडकीन शहरात बुधवारी भव्य जुलूस काढण्यात आला. धार्मिक उत्साह, भक्तिभाव आणि सामाजिक सलोख्याचे दर्शन घडविणारा हा जुलूस शांततेत आणि उत्स्फूर्त वातावरणात संपन्न झाला. शहरातील नागरिक, युवक आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
बुधवारी सकाळी आठ वाजता नुरानी मस्जिद येथे कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर मदिना मस्जिद, बसस्थानक परिसरातून जुलूस मार्गस्थ झाला. सादत चौक, हवालदार गल्ली, बागवान गल्ली, बिडकीन ग्रामपंचायत, बसस्थानक आणि शेकटा फाटा असा मार्गक्रमण करत जुलूस पुन्हा नुरानी मस्जिद येथे पोहोचला. याठिकाणी जुलूसची सांगता करण्यात आली.
जुलूसच्या मार्गावर विविध ठिकाणी स्थानिक युवकांच्या वतीने सहभागी नागरिकांसाठी गोड भात, गोड शिरा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ग्रामपंचायत सदस्य मिनाजभाई ईनामदार यांच्या वतीने सहभागी नागरिकांना फेटे बांधण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
ईद-ए-मिलादुन्नबीच्या कार्यक्रमासाठी नाशिक येथील प्रसिद्ध नातख्वान सय्यद शहबाज रजा आणि सय्यद अब्दुल रहमान यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष आकर्षण प्राप्त झाले.
जुलूसचे नियोजन नुरानी मस्जिद कमिटी आणि मदिना मस्जिद कमिटीच्या वतीने करण्यात आले. धार्मिक कार्यक्रमादरम्यान शांतता, शिस्त आणि सामाजिक सलोखा कायम राहावा, यासाठी आयोजकांसह नागरिकांनीही विशेष सहकार्य केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज पाटील पेरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तमिजुद्दीन ईनामदार, पंचायत समिती सदस्य लतीफ कुरेशी, ग्रामपंचायत सदस्य मेहमुद शहा, कौसर मिर्झा, काझी मुनिरोददीन, सय्यद असलम, आसिफ पठाण, शौकत सय्यद, शौकत पठाण, आजम शेख, फेरोज शेख, सद्दाम ईनामदार, अफसर शेख, लियाकत पठाण, जाहीर पठाण, अख्तर शहा, शेख अनसर सर, फेरोज ईनामदार, शफीक शेख, गौस सय्यद, महेबुब पठाण, मौलाना निजाम ईनामदार, मौलाना तारिक अन्वर, हाफिज आमीर, हाफिज वसीम, हाफिज इम्रान खान, फारुख सय्यद, शेख शब्बीरभाई, हाफिज ईनामदार, सद्दाम पटेल, अनिस पठाण यांच्यासह बिडकीनमधील नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, जुलूस सुरळीत आणि शांततेत पार पडावा यासाठी बिडकीन पोलिस ठाण्याच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे संपूर्ण जुलूस कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडला. ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने बिडकीन शहरात दिवसभर उत्साहपूर्ण आणि धार्मिक वातावरण अनुभवायला मिळाले.