कॉन्स्टेबल ते पोलीस उपअधीक्षक; सूर्यकांत कोकणे यांचा प्रेरणादायी प्रवास! पदोन्नतीनंतर छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर, दि. १३ (नजीमोद्दीन काजी) :- पोलीस दलात प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर पोलीस कॉन्स्टेबल पदापासून पोलीस उपअधीक्षक पदापर्यंत मजल मारणारे श्री. सूर्यकांत कोकणे यांची पदोन्नती होऊन छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथे पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘गाडेकर फार्म’ येथे माजी मंत्री श्री. अनिल पटेल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी निवृत्त अपर जिल्हाधिकारी श्री. नामदेवराव जाधव, श्री. पांडुरंग कुलकर्णी, श्री. कुंडलिकराव माने, शिवाजीराव जाधव यांच्यासह मित्रमंडळी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कॉन्स्टेबलपासून अधिकारीपदापर्यंतचा संघर्षमय प्रवास
श्री. सूर्यकांत कोकणे यांच्या कारकिर्दीचा प्रवास विशेष प्रेरणादायी आहे. सन २००४ मध्ये ते एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्यांच्या सेवाकाळातच त्यांनी पुढील अधिकारीपदाच्या दिशेने वाटचाल सुरू केली. त्याच काळात त्यांची PSI म्हणून निवड झाली.
त्यानंतरच्या काळात विविध जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी आपल्या कार्यक्षमतेची आणि कर्तव्यनिष्ठेची छाप पाडली. पोलीस कॉन्स्टेबलपासून पोलीस निरीक्षक आणि त्यानंतर आता पोलीस उपअधीक्षकपदापर्यंत पोहोचलेला त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
प्रतिकूल परिस्थितीतही सातत्यपूर्ण मेहनत, शिस्त, प्रामाणिकपणा आणि कर्तव्याप्रती असलेली निष्ठा यांच्या जोरावर अधिकारीपदापर्यंत पोहोचता येते, याचे सूर्यकांत कोकणे हे उत्तम उदाहरण ठरले आहेत.
दिगंबर गाडेकर पाटील यांच्या पुढाकारातून जंगी स्वागत
यावेळी माजी पोलीस अधीक्षक श्री. दिगंबर गाडेकर पाटील यांनी नवनियुक्त पोलीस उपअधीक्षक सूर्यकांत कोकणे यांचा उत्साहपूर्ण आणि जंगी सत्कार करून त्यांचे स्वागत केले.
जुन्या सहकाऱ्याच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचा हा क्षण उपस्थितांसाठी भावनिक आणि अभिमानास्पद ठरला. यावेळी मान्यवरांनी सूर्यकांत कोकणे यांचे अभिनंदन करून नवीन जबाबदारीतही त्यांच्या हातून उत्कृष्ट पोलीस सेवा घडावी आणि जनतेचा पोलीस दलावरील विश्वास अधिक दृढ व्हावा, अशा शुभेच्छा दिल्या.
कॉन्स्टेबल म्हणून सुरू झालेली सेवा ते पोलीस उपअधीक्षक पदापर्यंतचा प्रवास हा केवळ पदोन्नतीचा नाही, तर जिद्द, मेहनत आणि कर्तव्यनिष्ठेचा विजय आहे. सूर्यकांत कोकणे यांच्या पुढील सेवाकाळासाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित