रोपळेकर चौकात हेल्मेट घालून बॅग हिसकावली; CCTVच्या आधारे १२ तासांत आरोपी पोलिसांच्या ताब्यात!
जवाहरनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ₹४०,९६० रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १२ :- रोपळेकर चौक परिसरात पानटपरी चालकाच्या हातातील सामानाची बॅग बळजबरीने हिसकावून मोटारसायकलवरून पसार झालेल्या आरोपीला जवाहरनगर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत बेड्या ठोकल्या. CCTV फुटेज, गुप्त बातमीदार आणि सायबर सेलच्या तांत्रिक मदतीने पोलिसांनी आरोपीचा शोध घेत चोरीचा मुद्देमालही जप्त केला.
दिनांक १० सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जितेंद्र रणछोडदास वैष्णव (वय ५८), रा. टिळकनगर, उल्कानगरी हे रोपळेकर चौकाजवळील सागर पानटपरीची साफसफाई करून व्यवसाय सुरू करत होते. त्यावेळी लाल-काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून हेल्मेट घातलेला एक व्यक्ती त्यांच्या जवळ आला. मोटारसायकल थांबवून त्याने वैष्णव यांच्या हातातील काळ्या रंगाची बॅग बळजबरीने हिसकावली आणि मोटारसायकलवरून पसार झाला.
या बॅगेत ₹३२,५६० किमतीचे सिगारेट व बिडीचे बंडल, माचिसची पाकिटे, ₹७,८०० रोख रक्कम तसेच ₹६०० किमतीचे पेटीएम व भारतपेचे स्पीकर व स्कॅनर, असा एकूण ₹४०,९६० रुपयांचा मुद्देमाल होता.
याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४०२/२०२६, कलम ३०४(२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार मारोती गोरे व राजेंद्र शिंदे यांनी घटनास्थळावरील CCTV फुटेज तपासण्यास सुरुवात केली. तसेच गुप्त बातमीदारांकडून आरोपीबाबत माहिती घेण्यात आली. तपासादरम्यान आरोपी मनिष दिलीप गोरवाडकर (वय ४३), व्यवसाय- सिक्युरिटी गार्ड, रा. देवगिरी कॉलनी, सातारा-बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर हा नाईकनगर परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानंतर सायबर सेलच्या तांत्रिक मदतीने आरोपीचा ठावठिकाणा निश्चित करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने हेल्मेट घालून TVS मोटारसायकलवरून येत बॅग हिसकावल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
११ सप्टेंबर रोजी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या कालावधीत पोलिसांनी गुन्ह्यात चोरीस गेलेला ₹४०,९६० रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ रत्नाकर नवले, सहाय्यक पोलीस आयुक्त मनिष कल्याणकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोह/१४३२ तडवी, पोलीस अंमलदार मारोती गोरे व राजेंद्र शिंदे यांनी केली.
CCTV फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने अवघ्या १२ तासांत आरोपीपर्यंत पोहोचत जवाहरनगर पोलिसांनी या चोरीचा छडा लावला आहे.