MPSC विद्यार्थ्यांच्या आक्रोशाला रोहित पवारांचा पाठिंबा; अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्याची मागणी, सरकारला दिला इशारा

MPSC विद्यार्थ्यांच्या आक्रोशाला रोहित पवारांचा पाठिंबा; अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्याची मागणी, सरकारला दिला इशारा
MPSC विद्यार्थ्यांच्या आक्रोशाला रोहित पवारांचा पाठिंबा; अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्याची मागणी, सरकारला दिला इशारा

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ११ :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विविध प्रश्नांवरून विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित केलेल्या आक्रोश मोर्चाला आमदार रोहित पवार यांनी उपस्थिती लावत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी MPSCच्या अध्यक्ष आणि सचिवांच्या राजीनाम्याच्या मागणीसह विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विविध मागण्यांना पाठिंबा दर्शवला.

MPSCच्या परीक्षांमध्ये वारंवार निर्माण होणारे पेपरफुटीचे प्रकार, परीक्षा पुढे ढकलण्याचे निर्णय, ऑनलाइन परीक्षेचा मुद्दा तसेच ऑनलाइन परीक्षा प्रक्रियेशी संबंधित कथित टेंडर गैरव्यवहार अशा विविध प्रश्नांवर रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या विषयांवर शासनाने स्पष्ट भूमिका मांडण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील विविध शहरांमध्ये विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी आक्रोश मोर्चे काढत आहेत. मात्र, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारकडून अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला.

‘विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले, तर हा आक्रोश आणखी तीव्र होईल आणि सरकारला स्वस्थ बसू दिले जाणार नाही,’ असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

MPSCच्या परीक्षांमधील पारदर्शकता, वेळेवर परीक्षा घेणे आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेणे या मुद्द्यांवर शासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी मोर्चादरम्यान करण्यात आली.