हृदयद्रावक घटना! खवड्या डोंगरावर थरारक घटना; मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही दुर्दैवी अंत
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २१ :- तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर शुक्रवारी सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने परिसर हादरला. नैराश्यातून एका तरुणाने डोंगराच्या कड्यावर जाऊन टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या आई-वडिलांचाही या प्रयत्नात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत कुणाल मुरलीधर चांदवडे (वय १८), मुरलीधर चांदवडे आणि संगीता चांदवडे यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सुमारे दहाच्या वाजता कुणाल डोंगराच्या कड्यावर गेला होता. त्यानंतर त्याचे आई-वडील, तिसगावमधील ग्रामस्थ, पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. कुणालची समजूत काढण्यासाठी कुटुंबीय आणि ग्रामस्थांकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते.
जवळपास तीन तास कुणाल डोंगराच्या कड्यावरच होता. तो अधूनमधून जागा बदलत होता आणि आईशी संवादही साधत होता. ग्रामस्थ आणि सरपंचांनीही त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अत्यंत अस्वस्थ अवस्थेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
दुपारी सुमारे एकच्या सुमारास परिस्थिती अचानक गंभीर बनली. कुणालला थांबवण्याचा प्रयत्न करताना त्याचे वडील त्याच्याजवळ गेले. यावेळी दोघांचाही तोल गेला आणि ते खाली पडले. त्यानंतर आईनेही त्यांच्यामागे जाण्याचा प्रयत्न केला. उंचावरून पडल्याने तिघांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
'आता काहीच पर्याय नाही' असे म्हणत कुणालने घेतले टोकाचे पाऊल
कुणालची समजूत काढण्यासाठी ग्रामस्थांकडून विविध प्रकारे प्रयत्न करण्यात येत होते. तिसगावच्या सरपंचांनीही त्याच्याशी संवाद साधत त्याला जीवन संपवण्याचा विचार सोडण्याची विनंती केली. मात्र, कुणाल अत्यंत निराश अवस्थेत असल्याचे सांगितले जाते.
कुटुंबीय आणि ग्रामस्थ त्याला वारंवार समजावत असतानाही परिस्थिती नियंत्रणात आली नाही. अखेर काही क्षणांतच घडलेल्या या दुर्दैवी प्रकारामुळे एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला.
या घटनेने तिसगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.