बेरोजगारीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा एल्गार; २७ ऑगस्टला तिरंगा मोटरसायकल मोर्चा
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २५ :- राज्यातील वाढती बेरोजगारी आणि तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नाकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)च्या वतीने ‘बेरोजगार हक्क एल्गार’ तिरंगा मोटरसायकल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठवाड्यातील युवक, विद्यार्थी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
गुरुवार, २७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता हा मोर्चा क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय असा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व माजी मंत्री राजेश टोपे, खासदार बजरंग बाप्पा सोनवणे आणि आमदार संदीप क्षीरसागर करणार आहेत.
राज्यातील तरुणांसमोर रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, शिक्षण पूर्ण करूनही मोठ्या संख्येने युवक नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. या पार्श्वभूमीवर तरुणांच्या रोजगाराच्या न्याय्य हक्कासाठी आवाज बुलंद करण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.
मराठवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते, आजी-माजी खासदार, आमदार, तालुकाध्यक्ष, फ्रंटलचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, युवक आणि विद्यार्थ्यांनी स्वतःच्या दुचाकीसह शांततेच्या मार्गाने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मोर्चासाठी तिरंगा ध्वजासह मोठ्या संख्येने क्रांती चौकात उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, शहराध्यक्ष ख्वाजा शरोफोद्दीन मुल्ला, जिल्हाकार्याध्यक्ष विश्वजीत चव्हाण आणि शहरकार्याध्यक्ष आशिष पवार यांनी केले आहे.
रोजगाराचा प्रश्न केवळ राजकीय मुद्दा नसून तरुणांच्या भविष्याशी निगडित प्रश्न असल्याचे सांगत, या आंदोलनातून सरकारचे लक्ष वेधण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे.