“2011 पूर्वीच्या अतिक्रमणांचे नियमितीकरण करा” — अब्दुल रऊफ कुरैशी यांची नगरपंचायतीकडे जोरदार मागणी

“2011 पूर्वीच्या अतिक्रमणांचे नियमितीकरण करा” — अब्दुल रऊफ कुरैशी यांची नगरपंचायतीकडे जोरदार मागणी
“2011 पूर्वीच्या अतिक्रमणांचे नियमितीकरण करा” — अब्दुल रऊफ कुरैशी यांची नगरपंचायतीकडे जोरदार मागणी

महाराष्ट्र वाणी

फुलंब्री, दि.१९ :- फुलंब्री नगरपंचायत हद्दीतील शासकीय जमिनीवरील 2011 पूर्वीच्या अतिक्रमणधारकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेनेचे शहर कार्याध्यक्ष अब्दुल रऊफ कुरैशी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शासनाच्या 25 मार्च 2026 रोजीच्या महसूल व वनविभागाच्या शासननिर्णयाचा दाखला देत त्यांनी नगरपंचायत प्रशासनाला तातडीने अतिक्रमणधारकांचे अर्ज स्वीकारण्याची मागणी केली आहे.

यासंदर्भात मा. मुख्याधिकारी, नगरपंचायत फुलंब्री यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात शासन धोरणानुसार 2011 पूर्वीच्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमणांचे नियमितीकरण करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

कुरैशी यांनी निवेदनात म्हटले आहे की, नगरपंचायत प्रशासनाने नागरिकांचे अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करावा तसेच कार्यालयाच्या दर्शनी भागात शासन निर्णयाची माहिती जाहीरपणे लावावी. प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र व अपात्र अर्जांचा अहवाल तयार करून तो उपविभागीय अधिकारी, पैठण-फुलंब्री समितीकडे पाठवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

फुलंब्री शहरातील अनेक कुटुंबे वर्षानुवर्षे शासकीय जमिनीवर वास्तव्यास असून त्यांना हक्काचे घर व कायदेशीर संरक्षण मिळावे, यासाठी हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात येत आहे.

या निवेदनाच्या प्रत जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि नगराध्यक्ष यांनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता नगरपंचायत प्रशासन या मागणीवर काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

“अतिक्रमणधारकांना न्याय मिळणार का? फुलंब्रीत आता या प्रश्नावर राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत!”