प्रशासनाला आली जाग! हर्सुल-जटवाडा सिमेंट रस्त्यावरील धोकादायक वीजखांब अखेर हटणार

प्रशासनाला आली जाग! हर्सुल-जटवाडा सिमेंट रस्त्यावरील धोकादायक वीजखांब अखेर हटणार
प्रशासनाला आली जाग! हर्सुल-जटवाडा सिमेंट रस्त्यावरील धोकादायक वीजखांब अखेर हटणार

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. २३ :- हर्सुल जेल ते जटवाडा दरम्यान नव्याने उभारण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणारे वीजखांब न हटवता रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आल्याने वाहनचालकांसमोर गंभीर धोका निर्माण झाला आहे. रस्त्याच्या मधोमध असलेल्या या वीजखांबांमुळे परिसरात वारंवार अपघात घडत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत होती.

या प्रकरणाची दखल घेत आमदार प्रदीप जैस्वाल यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यांच्या हस्तक्षेपानंतर संबंधित प्रशासनाने हालचाली सुरू करत वीजखांब हटवण्याच्या प्रक्रियेला गती दिली आहे.

दोन दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सोनटक्के व जोशी तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी संयुक्त पाहणी केली. यावेळी माध्यमांनी विचारणा केली असता, येत्या दोन दिवसांत वीजखांब हटवण्याचे काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, वीजखांब स्थलांतराचे काम मिळालेल्या लिनियर इंटरप्रायजेस कंपनीचे अभियंता शिवाजी किसे हे देखील पाहणीवेळी उपस्थित होते. नागरिकांनी हे काम तातडीने पूर्ण करून वाहतूक सुरक्षित करण्याची मागणी केली आहे.