नारेगावात अंमली पदार्थविरोधी मोठी कारवाई! 5.176 किलो गांजा जप्त; दोन महिलांवर NDPS अंतर्गत गुन्हा

नारेगावात अंमली पदार्थविरोधी मोठी कारवाई! 5.176 किलो गांजा जप्त; दोन महिलांवर NDPS अंतर्गत गुन्हा
नारेगावात अंमली पदार्थविरोधी मोठी कारवाई! 5.176 किलो गांजा जप्त; दोन महिलांवर NDPS अंतर्गत गुन्हा

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १५ :- शहरातील नारेगाव येथील बलुच गल्ली परिसरात अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने धडक कारवाई करत तब्बल 5 किलो 176 ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत ₹2 लाख 83 हजार 800 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन महिलांविरुद्ध NDPS कायद्यान्वये एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 14 जुलै 2026 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक रविकांत गच्चे, पोलीस उपनिरीक्षक उत्रेश्वर मुंडे आणि त्यांच्या पथकाने बलुच गल्ली क्रमांक 9, भाटनगर, नारेगाव येथे छापा टाकला.

कारवाईदरम्यान एका 40 वर्षीय महिलेच्या ताब्यातून 3 किलो 596 ग्रॅम गांजा, दोन मोबाईल हँडसेट आणि एक इलेक्ट्रॉनिक वजनकाटा असा ₹2,04,800 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यानंतर परिसरात शोधमोहीम राबविताना जवळील पत्र्याच्या टपरीतून आणखी 1 किलो 580 ग्रॅम गांजा (किंमत ₹79,000) आढळून आला. संबंधित टपरीही त्याच महिलेकडून चालवली जात असल्याचे निष्पन्न झाले.

या दोन्ही ठिकाणांवरून एकूण 5 किलो 176 ग्रॅम गांजा, दोन मोबाईल आणि वजनकाटा असा ₹2,83,800 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित दोन महिलांविरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपायुक्त (गुन्हे) शशिकांत सातव, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मजहर सय्यद, पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.

पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, शहरात कुठेही अंमली पदार्थांची विक्री, सेवन किंवा त्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती असल्यास 9684702002 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर कळवावी.