जितेंद्र जैस्वाल यांची प्रत्येक तालुक्यात कोल्ड स्टोरेज उभारण्याची मागणी; कृषी समिती बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. ३१ :- जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरच्या कृषी समितीची मासिक बैठक गुरुवारी (दि. ३०) दुपारी ३ वाजता जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कृषी समिती सभापती जितेंद्र जैस्वाल यांच्या दालनात पार पडली. बैठकीत शेतकऱ्यांशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीला जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कृषी समिती सभापती जितेंद्र जैस्वाल, सदस्य आयेशाबेगम नाशीरहुसेन सय्यद, उत्तम चव्हाण, आजिनाथ धामणे, स्वाती पाटेकर, संगिता अमराव, अर्जुन नितीन पाटील तसेच कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील उपस्थित होते.
यावेळी सभापती जितेंद्र जैस्वाल यांनी भाजीपाला, फळपिके आणि इतर नाशवंत कृषी उत्पादनांच्या साठवणुकीसाठी प्रत्येक तालुक्यात कोल्ड स्टोरेज आणि वेअरहाऊस उभारण्याची गरज व्यक्त केली. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल खराब होणार नाही आणि त्यांना योग्य दर मिळण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
बैठकीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेमार्फत दिल्या जाणाऱ्या लाभ योजनांचाही आढावा घेण्यात आला. गंगापूर परिसरातील टोमॅटो पिकांवर आलेल्या विषाणूजन्य रोगाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. या रोगाची तीव्रता लक्षात घेऊन प्रयोगशाळांमध्ये नमुने तपासणीसाठी पाठविण्याच्या सूचना सभापतींनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
तसेच कृषी खते आणि औषधांच्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत विक्री दर जास्त असल्याने काही विक्रेत्यांकडून नफेखोरी होत असल्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. यावर नियंत्रण आणण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधा, शेतमाल साठवणूक आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत, अशी अपेक्षा बैठकीत व्यक्त करण्यात आली.