अन्न व औषध निरीक्षक भरतीतील कथित पेपरफुटीवर रोहित पवार आक्रमक; आयुक्त तुकाराम मुंडे यांना थेट निवेदन

अन्न व औषध निरीक्षक भरतीतील कथित पेपरफुटीवर रोहित पवार आक्रमक; आयुक्त तुकाराम मुंडे यांना थेट निवेदन
अन्न व औषध निरीक्षक भरतीतील कथित पेपरफुटीवर रोहित पवार आक्रमक; आयुक्त तुकाराम मुंडे यांना थेट निवेदन

महाराष्ट्र वाणी

मुंबई, दि. २७ :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या अन्न व औषध निरीक्षक (Advertisement No. 16/2025) भरती परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणी आमदार रोहित राजेंद्र पवार यांनी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले. या प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष व वेळबद्ध चौकशी करण्यात यावी, तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत भरती प्रक्रियेतील नियुक्त्या स्थगित ठेवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

२२ मार्च २०२६ रोजी झालेल्या परीक्षेबाबत विविध तक्रारी, डिजिटल पुरावे आणि सोशल मीडियावरील माहितीकडे लक्ष वेधत रोहित पवार यांनी परीक्षेच्या दोन दिवसांपूर्वी कथित प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅप स्टेटसवर प्रसारित झाल्याचा आरोप केला. तसेच लीक झालेल्या कथित प्रश्नपत्रिकेतील आणि प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्नांमध्ये मोठे साम्य असल्याचे दावे समोर आले असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले.

"१०० पैकी ९० प्रश्न जुळले", "मोबाईलवरून नक्कल झाली" अशा स्वरूपाचे संदेश सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. तसेच २० मार्च रोजी एका उमेदवाराला कथित प्रश्नपत्रिकेचे फोटो पाठविण्यात आले आणि त्या उमेदवाराला परीक्षेत उच्च गुण मिळाल्याचा दावाही करण्यात आला आहे.

या सर्व प्रकारामुळे राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवक-युवतींचा भरती प्रक्रियेवरील विश्वास डळमळीत झाल्याचे रोहित पवार यांनी म्हटले. त्यामुळे या प्रकरणातील गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच गैरव्यवहार सिद्ध झाल्यास परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घ्यावी, अशी मागणीही त्यांनी आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडे केली.