ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; 14 गोवंशांची सुटका, 4 वाहने जप्त, 9.85 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; 14 गोवंशांची सुटका, 4 वाहने जप्त, 9.85 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद), दि. १६ :- गोवंश जनावरांची अवैध आणि क्रूर पद्धतीने वाहतूक करणाऱ्यांविरोधात छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत वैजापूर आणि पैठण येथे दोन स्वतंत्र कारवायांमध्ये 14 गोवंश जनावरे, 4 मालवाहू वाहने आणि सुमारे 9.85 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध विविध कायद्यांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वैजापूर येथे 10 जनावरे आणि 3 वाहने जप्त

15 जुलै रोजी दुपारी डायल-112 वर मिळालेल्या माहितीच्या आधारे वैजापूर-शिऊर रोडवरील एमआयटी कॉलेज, रोटेगाव रेल्वे पुलाजवळ पोलिसांनी सापळा रचला. तपासणीदरम्यान 7 जर्सी गायी आणि 3 वासरे दाटीवाटीने कोंबून, चारापाण्याविना आणि आखूड दोऱ्यांनी बांधून अमानुष पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचे आढळले.

या कारवाईत सुनील मनोहर मघरे (रा. टाकळी, ता. सिल्लोड), जुबेर फरीद कुरेशी (रा. पिशोर, ता. कन्नड) आणि आसिफ भिकन शहा (रा. पिशोर, ता. कन्नड) यांना ताब्यात घेण्यात आले.

त्यांच्याकडून तीन बोलेरो/पिकअप वाहने जप्त करण्यात आली असून सुमारे 6.40 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपींविरुद्ध प्राणी क्रूरता प्रतिबंधक अधिनियम, 1960 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पैठणमध्ये 2 गोवंशांसह आरोपी ताब्यात

याच दिवशी सायंकाळी जायकवाडी फाटा येथे पैठण पोलिसांनी एका संशयित टाटा छोटा हत्ती वाहनाची तपासणी केली. त्यामध्ये 2 गोवंश जनावरे चारापाण्याविना व क्रूर पद्धतीने कत्तलीसाठी वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले.

या प्रकरणी शफीक रफीक शेख (रा. रांजणगाव दांडगा, ता. पैठण) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून वाहनासह 3.45 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम, 1976 तसेच प्राणी क्रूरता प्रतिबंधक अधिनियम, 1960 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईचा एकूण आढावा

4 आरोपींवर गुन्हे दाखल

14 गोवंश जनावरे (11 गायी व 3 वासरे) सुरक्षित जप्त

4 मालवाहू वाहने जप्त

9.85 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

ग्रामीण पोलिसांनी स्पष्ट केले आहे की गोवंश जनावरांची बेकायदेशीर वाहतूक, प्राण्यांवरील क्रूरता आणि कत्तलीसाठी होणारी अवैध ने-आण रोखण्यासाठी यापुढेही विशेष मोहिमा सुरू राहतील. अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.