खत विक्रीच्या मोबाईल प्रणालीमुळे शेतकरी अडचणीत; डॉ. कल्याण काळे व संदीपान भुमरे यांचा केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १८ :- जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या “Framework for Fertilizer Sale” या मोबाईल आधारित खत विक्री प्रणालीमुळे शेतकरी आणि खत विक्रेत्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. कल्याण काळे आणि छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी केंद्रीय रसायन व खत मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन ही प्रणाली तात्पुरती स्थगित करण्याची मागणी केली आहे.
खरीप हंगामाच्या तोंडावर खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत असताना मोबाईल प्रणालीतील तांत्रिक अडचणी, नेटवर्क समस्या आणि व्यवहार पूर्ण होण्यास होणारा विलंब यामुळे शेतकरी व विक्रेते दोघांनाही त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी खत वितरण प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असून त्याचा थेट परिणाम शेतीच्या कामांवर होत असल्याचे खासदारांनी केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
खासदार डॉ. कल्याण काळे आणि संदीपान भुमरे यांनी शेतकऱ्यांना वेळेत व विनाअडथळा रासायनिक खते उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगत, सद्यस्थितीत ही प्रणाली स्थगित करून पर्यायी व्यवस्था सुरू करण्याची मागणी केली. तसेच शेतकरी आणि खत विक्रेत्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, असेही त्यांनी नमूद केले.
दोन्ही खासदारांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. खरीप हंगामात कोणत्याही शेतकऱ्याला खतांच्या उपलब्धतेसंदर्भात अडचण येऊ नये, यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
"शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न असेल, तर त्यासाठीचा संघर्ष आणि पाठपुरावा कायम सुरू राहील," अशी भूमिका खासदारांनी यावेळी मांडली.
👉 शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी संबंधित अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी वाचा — महाराष्ट्र वाणी.