"जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी नागरिकांची हेलपाटे; राष्ट्रवादी काँग्रेसची जलीस अहमद यांच्या नेतृत्वात मनपाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी"
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ३० :- जन्म आणि मृत्यू नोंदणीचे दाखले मिळविण्यासाठी शहरातील नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने आज महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदनही सादर करण्यात आले.
शहरातील नागरिकांना जन्म आणि मृत्यू दाखले मिळविण्यासाठी तीन ते चार महिने महानगरपालिकेच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचे शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. या विलंबामुळे नागरिकांना मानसिक, आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले.
दाखले देण्यास होणाऱ्या विलंबाबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, प्रत्येक वॉर्ड कार्यालयात केवळ एकच संगणक किंवा एकाच युजर आयडीच्या माध्यमातून दाखले तयार केले जात असल्याचे कारण सांगितले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.
महानगरपालिकेची ही कार्यपद्धती नागरिकांच्या अडचणींचे प्रमुख कारण ठरत असल्याचे सांगत, प्रत्येक वॉर्ड कार्यालयात आवश्यक संख्येने संगणक आणि स्वतंत्र युजर आयडी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे जन्म-मृत्यू दाखले वेळेत मिळतील आणि नागरिकांची होणारी गैरसोय टळेल, असे शिष्टमंडळाने स्पष्ट केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष जलीस अहमद यांनी अतिरिक्त आयुक्तांना निवेदन सादर केले.
या शिष्टमंडळात मध्य विधानसभा शहराध्यक्ष शेख रफीक, प्रदेश सचिव (पदवीधर विभाग) शेख मुकर्रम, शहर जिल्हा उपाध्यक्ष अशरफ पठाण, शहर जिल्हा सचिव सलीम सिद्दीकी, मध्य विधानसभा उपाध्यक्ष जफर कुरेशी, वासेफ इनामदार, पश्चिम शहर उपाध्यक्ष शेख अनीस, मध्य विधानसभा उपाध्यक्ष शेख एजाज, वॉर्ड अध्यक्ष श्याम तुपे, शेख उस्मान यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.