सिडको पोलिसांचा मोठा पर्दाफाश! ११.२० लाखांच्या २८ चोरीच्या मोटारसायकली जप्त; चार सराईत चोर जेरबंद
CCTV फुटेज, गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने सिडको पोलिसांची मोठी कारवाई; आणखी मोटारसायकली हस्तगत होण्याची शक्यता.
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १ :- सिडको पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश करत ११ लाख २० हजार रुपये किमतीच्या २८ चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या प्रकरणी योगेश कैलास गाडेकर, कार्तिक गणेश पवार, सौरभ दिलीप वाघचौरे आणि राहुल कैलास बोरसे या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
५ जुलै २०२६ रोजी हरिओमनगर येथील संजय भगवान बडक यांनी मोटारसायकल चोरीची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सिडको पोलिसांनी तब्बल ५० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला.
३० जुलै रोजी पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे योगेश गाडेकर याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने जाधववाडी, एम्स हॉस्पिटल, टीव्ही सेंटर परिसरातून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. तसेच चोरीच्या गाड्या कन्नड तालुक्यातील साथीदारांकडे विक्रीसाठी ठेवल्याची माहिती दिली.
त्यानंतर पोलिसांनी कार्तिक पवार, सौरभ वाघचौरे आणि राहुल बोरसे यांना अटक करून त्यांच्या ताब्यातील एकूण २८ चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या. न्यायालयाने आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, आणखी काही चोरीच्या मोटारसायकली हस्तगत होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-२) रत्नाकर नवले आणि सहाय्यक पोलीस आयुक्त मनोज पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या मोहिमेत सिडको पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल येरमे, पोलीस उपनिरीक्षक अनिल नाणेकर, पोलीस उपनिरीक्षक अमोल जगताप, पोलीस हवालदार मंगेश पवार तसेच पोलीस अंमलदार सहदेव साबळे, अमोल अंभोरे, प्रदीप फरकाडे आणि अतुल सोळुंके यांनी सहभाग घेतला.
पोलिसांचे आवाहन : कोणतीही मोटारसायकल खरेदी करण्यापूर्वी तिची कागदपत्रे, मालकी हक्क आणि वाहनाची संपूर्ण माहिती तपासून घ्यावी. कमी किमतीत मिळणाऱ्या संशयास्पद वाहनांपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.