कर्जमाफीचा लाभ हवा? तर तातडीने ई-केवायसी करा! जिल्ह्यातील १.०५ लाख शेतकरी पात्र; फक्त १४ हजारांनीच प्रक्रिया पूर्ण केली

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६; उर्वरित ९० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी त्वरित आधार प्रमाणीकरण करण्याचे प्रशासनाचे आवाहन

कर्जमाफीचा लाभ हवा? तर तातडीने ई-केवायसी करा! जिल्ह्यातील १.०५ लाख शेतकरी पात्र; फक्त १४ हजारांनीच प्रक्रिया पूर्ण केली
कर्जमाफीचा लाभ हवा? तर तातडीने ई-केवायसी करा! जिल्ह्यातील १.०५ लाख शेतकरी पात्र; फक्त १४ हजारांनीच प्रक्रिया पूर्ण केली

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. २७ :- राज्य शासनाच्या "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६" अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १ लाख ५ हजार १२८ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. मात्र, या लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत केवळ १४ हजार ७६९ शेतकऱ्यांनीच ई-केवायसी (आधार प्रमाणीकरण) पूर्ण केले असून ९० हजार ३५९ शेतकऱ्यांची प्रक्रिया अद्याप बाकी आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी कोणताही विलंब न करता ई-केवायसी पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर जिल्ह्यातील १,२७६ गावांमधील १ लाख ९० हजार ७०१ शेतकऱ्यांची नावे शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली. त्यापैकी सध्या १ लाख ५ हजार १२८ शेतकरी पात्र ठरले असून ही संख्या पुढील पडताळणीनंतर वाढण्याची शक्यता आहे.

पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध होताच जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, जिल्हा बँक, इतर बँका, ग्रामपंचायत कार्यालयांसह विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी नाव पडताळण्यासाठी मोठी गर्दी केली.

जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केल्यानंतरच त्यांच्या कर्ज खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण करणे अत्यावश्यक आहे.

ई-केवायसी पूर्णपणे मोफत

सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की, या योजनेसाठी करण्यात येणारी ई-केवायसी प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य आहे. त्यामुळे आपले सरकार सेवा केंद्र (ASSK) किंवा CSC केंद्रांनी शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारू नये. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनीही जिल्ह्यातील सर्व सेवा केंद्रांना याबाबत सक्त सूचना दिल्या आहेत.

कुठे मिळेल पात्र यादी?

पात्र शेतकऱ्यांची यादी खालील ठिकाणी उपलब्ध आहे –

संबंधित बँक शाखा

विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था

CSC केंद्र

आपले सरकार सेवा केंद्र

ग्रामपंचायत कार्यालय

तलाठी कार्यालय

सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालय

ई-केवायसीसाठी काय आवश्यक?

कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा CSC केंद्रावर जाऊन ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. त्यासाठी:

लाभार्थी यादीत नाव असल्याची खात्री

मूळ आधार कार्ड

बचत खात्याचे पासबुक

अंगठ्याद्वारे बायोमेट्रिक प्रमाणीकरण

ही कागदपत्रे सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, आधार प्रमाणीकरण, आधार संलग्नीकरण आणि अग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण केल्यानंतरच कर्जमाफीचा लाभ टप्प्याटप्प्याने खात्यात जमा केला जाणार आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी कोणताही विलंब न करता प्रक्रिया पूर्ण करून शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.