मतदारांनो लक्ष द्या! ८ ऑगस्टपूर्वी BLO कडे गणना अर्ज द्या, मतदार यादीत नाव कायम ठेवा

१७ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी, १९ ऑक्टोबरला अंतिम यादी प्रसिद्ध; नाव समाविष्ट, दुरुस्ती व हरकतीसाठी स्वतंत्र मुदत

मतदारांनो लक्ष द्या! ८ ऑगस्टपूर्वी BLO कडे गणना अर्ज द्या, मतदार यादीत नाव कायम ठेवा
मतदारांनो लक्ष द्या! ८ ऑगस्टपूर्वी BLO कडे गणना अर्ज द्या, मतदार यादीत नाव कायम ठेवा

महाराष्ट्र वाणी

मुंबई, दि. २७ जुलै :- महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाला वेग आला असून, सध्याच्या मतदार यादीतील सर्व मतदारांनी ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत गणना अर्ज भरून तो गृहभेटीस येणाऱ्या संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे जमा करावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.

वेळेत अर्ज भरून स्वाक्षरीसह सादर करणाऱ्या मतदारांची नावे १७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट केली जाणार आहेत.

ज्या पात्र मतदारांची नावे प्रारूप यादीत नसतील किंवा जे नवमतदार असतील, त्यांना १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नमुना क्र. ६ भरून नाव समाविष्ट करण्याची संधी मिळणार आहे. या कालावधीत मतदारांना नोंदीतील दुरुस्तीसाठी नमुना क्र. ८, तर नाव वगळण्यासाठी हरकत नोंदविण्यासाठी नमुना क्र. ७ सादर करता येणार आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, अर्ज करताना चुकीची माहिती किंवा खोटी घोषणा केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम ३१ अंतर्गत एक वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

या विशेष पुनरिक्षणानंतर १९ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. मात्र, त्यानंतरही लोकप्रतिनिधित्व अधिनियमातील कलम २२ व २३ नुसार पात्र नागरिकांना नमुना क्र. ६ द्वारे नाव समाविष्ट करणे किंवा आवश्यक दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. ही प्रक्रिया संबंधित निवडणुकीच्या नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंत सुरू राहणार असल्याचेही कार्यालयाने स्पष्ट केले आहे.