मिन्नू पी.एम. यांच्या नेतृत्वाखाली धाकटी पंढरपूरात भव्य स्वच्छता मोहीम; १,००० कर्मचाऱ्यांचा सहभाग
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २६ :- आषाढी एकादशीनिमित्त धाकटी पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्यासह मराठवाड्यातील हजारो भाविकांनी गर्दी केली होती. भाविकांसाठी विविध ठिकाणी अन्नदानाचे स्टॉल उभारण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व इतर कचरा निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम. यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी धाकटी पंढरपूर येथे भव्य 'स्वच्छता सेवा अभियान' राबविण्यात आले.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक वासुदेव सोळंके यांनी या मोहिमेचे नियोजन केले. मंदिर परिसरासह पंढरपूर, रांजणगाव शेणपुंजी, तिसगाव, पाटोदा आणि वळदगाव परिसरातील १७ ठिकाणे स्वच्छतेसाठी निश्चित करण्यात आली. प्रत्येक ठिकाणी विभागप्रमुख आणि गटविकास अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबविली.
या अभियानात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत स्तरावरील सुमारे १,००० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा साचलेला ओला व सुका कचरा, प्लास्टिक आणि इतर टाकाऊ वस्तू गोळा केल्या. या मोहिमेत दोन ट्रॅक्टरभर कचरा संकलित करण्यात आला.
जमा झालेला कचरा वाहून नेण्यासाठी पंढरपूर ग्रामपंचायतीसह वाळूज आणि वळदगाव ग्रामपंचायतींनी ट्रॅक्टर व घंटागाड्यांची व्यवस्था केली. सुमारे तीन तास चाललेल्या या मोहिमेनंतर संकलित कचरा पुढील प्रक्रियेसाठी महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी अनेक कर्मचाऱ्यांनी भावना व्यक्त करत, "आषाढी एकादशीच्या दिवशी गर्दीमुळे विठ्ठलाचे दर्शन घेता आले नव्हते. मात्र आज स्वच्छता करताना खऱ्या अर्थाने पांडुरंगाचे दर्शन झाल्याचा अनुभव आला," असे सांगितले.
या अभियानात पंढरपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच वैशाली राऊत, उपसरपंच रेश्मा शेख, ग्रामविकास अधिकारी हरीश आंधळे, माजी सरपंच आख्तर शेख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.