भाजप आमदारांच्या पतीचा पीडब्ल्यूडीला रामराम; मुख्य अभियंता अतुल चव्हाणांचा अचानक राजीनामा, व्हॉट्सॲप स्टेटसची चर्चा

भाजप आमदारांच्या पतीचा पीडब्ल्यूडीला रामराम; मुख्य अभियंता अतुल चव्हाणांचा अचानक राजीनामा, व्हॉट्सॲप स्टेटसची चर्चा
भाजप आमदारांच्या पतीचा पीडब्ल्यूडीला रामराम; मुख्य अभियंता अतुल चव्हाणांचा अचानक राजीनामा, व्हॉट्सॲप स्टेटसची चर्चा

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) :- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) मराठवाडा प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी ३१ जुलै रोजी आपल्या पदाचा अचानक राजीनामा सादर केल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. पदोन्नती प्रक्रियेत होत असलेल्या विलंबामुळे आणि पात्रता असूनही संधी नाकारली जात असल्याच्या नाराजीतून त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.

अतुल चव्हाण यांच्या पत्नी अनुराधा चव्हाण या फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार आहेत. राजकारण आणि प्रशासनातील महत्त्वाच्या पदांमुळे त्यांच्या कुटुंबाबाबत विविध चर्चा रंगत असतानाच शासनाने जून महिन्यात त्यांची मुंबईतील नगर परिषद प्रशासन संचालनालयात बदली केली होती. त्यांना ३१ जुलैपर्यंत नवीन पदावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले होते.

दरम्यान, सचिवपदाच्या पदोन्नतीसाठी त्यांचे नाव चर्चेत होते. संबंधित प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता, मात्र त्यावर अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. मार्च २०३० मध्ये सेवानिवृत्त होणे अपेक्षित असताना त्यांनी तब्बल चार वर्षे आधीच शासकीय सेवेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

राजीनाम्यानंतर त्यांनी व्हॉट्सॲपवर ठेवलेले "अंत नहीं, यह एक नई शुरुआत है..." हे स्टेटस सध्या प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

अतुल चव्हाण यांनी १६ ऑगस्ट १९९४ रोजी शासकीय सेवेत प्रवेश केला होता. सुमारे ३२ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अष्टविनायक दर्शन मार्ग, समृद्धी महामार्ग, विद्यापीठातील डिजिटल स्टुडिओ तसेच कोल्हापूर सर्किट बेंचच्या पुनर्बांधणीसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये योगदान दिले. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल २०१० मध्ये त्यांना 'उत्कृष्ट अभियंता' पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.