मराठवाड्यात पावसाळ्यातही टँकरची धावपळ; २५६ गावांना ४२८ टँकरद्वारे पाणीपुरवठा, संभाजीनगर जिल्हा अव्वल
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २६ :- पावसाळा सुरू असूनही मराठवाड्यात अनेक भागांमध्ये अपेक्षित पाऊस न झाल्याने पाणीटंचाईचे संकट अद्याप कायम आहे. परिणामी, मराठवाड्यातील २५६ गावांना आणि काही वाड्या-वस्त्यांना मिळून एकूण ४२८ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे, मे महिन्याच्या तुलनेत टँकरची संख्या दुप्पट वाढल्याने ग्रामीण भागातील पाणीस्थितीची गंभीरता पुन्हा एकदा समोर आली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, मे महिन्यात मराठवाड्यात २१० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, जुलै महिन्याच्या अखेरीस अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने ही संख्या थेट ४२८ टँकरांपर्यंत पोहोचली आहे.
संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक टँकर
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक २२३ टँकर कार्यरत आहेत. त्यानंतर जालना जिल्ह्यात १०९, बीडमध्ये ७१, नांदेडमध्ये १५, धाराशिवमध्ये ८, तर लातूर आणि हिंगोलीमध्ये प्रत्येकी १ टँकर पिण्याच्या पाण्यासाठी धावत आहे. यावरून संभाजीनगर आणि जालन्यातील पाणीटंचाईची तीव्रता स्पष्ट होत आहे.
पावसाची असमानता ठरतेय संकटाचे कारण
यंदा पावसाळा सुरू झाल्यानंतर काही भागात चांगला पाऊस झाला असला तरी अनेक तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे. त्यामुळे धरणे, तलाव, बंधारे आणि विहिरींमध्ये अपेक्षित पाणीसाठा निर्माण झालेला नाही. भूजल पातळीही समाधानकारक वाढलेली नसल्याने अनेक गावांमध्ये टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.
प्रशासनाची उपाययोजना सुरू
जिल्हा प्रशासन आणि पाणीपुरवठा विभागाकडून टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे, त्या ठिकाणी अतिरिक्त टँकर उपलब्ध करून देण्याबरोबरच पाण्याच्या स्रोतांवरही सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.
आगामी पावसाकडे सर्वांचे लक्ष
हवामान विभागाने पुढील काही दिवसांत काही भागांत पावसाची शक्यता व्यक्त केली असली तरी, मराठवाड्यात समाधानकारक पाऊस होणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पावसात सातत्य राहिल्यास टँकरवरील अवलंबित्व कमी होईल आणि ग्रामीण भागाला मोठा दिलासा मिळू शकतो. मात्र, पाऊस लांबल्यास पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.