बेशिस्त रिक्षाचालकांवर पोलिसांचा मोठा दणका; १,२१५ रिक्षांवर कारवाई, तब्बल ₹१९.५२ लाखांचा दंड

बेशिस्त रिक्षाचालकांवर पोलिसांचा मोठा दणका; १,२१५ रिक्षांवर कारवाई, तब्बल ₹१९.५२ लाखांचा दंड
बेशिस्त रिक्षाचालकांवर पोलिसांचा मोठा दणका; १,२१५ रिक्षांवर कारवाई, तब्बल ₹१९.५२ लाखांचा दंड

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ३० :- शहरातील बेशिस्त आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. सोमवारी (२८ जुलै २०२६) सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत चाललेल्या या मोहिमेत तब्बल १,२१५ रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

वाहतूक पोलिसांनी रिक्षा थांब्यावर बेशिस्तपणे वाहने उभी करणे, विनागणवेश रिक्षा चालविणे, पुढील सीटवर प्रवासी बसविणे, विनापरवाना वाहन चालविणे तसेच मोठ्या प्रमाणात प्रलंबित दंड असलेल्या रिक्षांवर विशेष लक्ष केंद्रित केले.

या धडक मोहिमेदरम्यान ₹१९ लाख ५२ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला, तर त्यापैकी ₹१ लाख ३९ हजार ६०० रुपयांची वसुली करण्यात आली. तसेच नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या सहा रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपआयुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक) सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक रेखा लोंढे, मंगेश जगताप, पवन चौधरी तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक रविकांत गच्चे आणि सचिन मिरधे यांनी आपल्या पथकासह ही मोहीम राबवली.

वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे की, नियमांचे पालन करणाऱ्या रिक्षाचालकांना कोणताही त्रास होणार नाही. मात्र, बेशिस्त, उद्धट आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांविरोधातील कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे.

वाहतूक विभागाने सर्व रिक्षाचालक आणि वाहनधारकांना नियमांचे पालन करून शिस्तीत वाहन चालविण्याचे आवाहन केले आहे.