छत्रपती संभाजीनगर : ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी वेगात; 638 ग्रामपंचायतींसाठी मतदानाची शक्यता

24 जुलैला प्रारूप मतदार यादी, 4 ऑगस्टला अंतिम यादी; थेट सरपंच निवडीमुळे चुरस वाढणार.

छत्रपती संभाजीनगर : ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी वेगात; 638 ग्रामपंचायतींसाठी मतदानाची शक्यता

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १९ :- जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी प्रशासनाने वेगाने सुरू केली असून, मुदत संपलेल्या, मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापन झालेल्या मिळून 638 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, निवडणूक कार्यक्रमाची घोषणा अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर अपेक्षित आहे.

आरक्षण निश्चिती प्रक्रियेत आढळलेल्या त्रुटींमुळे पैठण, गंगापूर आणि सोयगाव तालुक्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये आरक्षणाची प्रक्रिया पुन्हा राबविण्यात आली. त्यानंतर बहुतांश ग्रामपंचायतींची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून, उर्वरित ठिकाणी आक्षेपांनुसार सुधारित आरक्षण प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

प्रारूप मतदार यादी 24 जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. 24 ते 29 जुलै या कालावधीत नागरिकांना हरकती आणि सूचना नोंदविता येतील. त्यानंतर छाननी पूर्ण करून 4 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे.

थेट सरपंच निवडीमुळे वाढणार चुरस

यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सरपंचांची निवड थेट जनतेच्या मतदानातून होणार आहे. त्यामुळे सदस्यांसह सरपंचपदासाठीही स्वतंत्र आणि चुरशीच्या लढती पाहायला मिळण्याची शक्यता आहे. गावागावात राजकीय हालचालींना वेग आला असून, विविध पक्ष आणि इच्छुक उमेदवारांनी संघटनबांधणी, प्रचाराची आखणी आणि मतदारांशी संपर्क वाढविण्यावर भर दिला आहे.

स्थानिक विकासकामे, सामाजिक समीकरणे आणि गावपातळीवरील नेतृत्वाची कसोटी लागणाऱ्या या निवडणुकांकडे जिल्ह्यासह राज्याचेही लक्ष लागले आहे.