विभागीय आयुक्त जी.श्रीकांत यांची शहरातील स्वच्छता व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी; घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याच्या सूचना
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २६ :- शहरातील स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन अधिक कार्यक्षम, शाश्वत आणि परिणामकारक करण्याच्या उद्देशाने विभागीय आयुक्त जी.श्रीकांत (भा.प्र.से.) यांनी स्वतः पुढाकार घेत विविध भागांतील स्वच्छता कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी स्वच्छता उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले.
पाहणीदरम्यान विभागीय आयुक्तांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या कामकाजातील अडचणी जाणून घेतल्या. तसेच शहरातील कचरा संकलन, ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण, वाहतूक आणि घनकचरा व्यवस्थापनाची संपूर्ण प्रक्रिया तपासून तिची कार्यक्षमता पडताळून पाहिली.
यावेळी स्वच्छता व्यवस्थेत अधिक सुधारणा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, संसाधनांचा प्रभावी वापर आणि नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध बाबींवर चर्चा करण्यात आली. संबंधित विभागांनी स्वच्छता मोहिमेत सातत्य ठेवून शहर अधिक स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी प्रभावी नियोजन करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्तांनी दिल्या.
शहरातील स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांनी कचरा योग्य ठिकाणी टाकणे, ओला व सुका कचरा वेगळा करणे आणि स्वच्छता उपक्रमांना सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन केले.
स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी छत्रपती संभाजीनगर घडविण्यासाठी प्रशासन आणि नागरिक यांच्या संयुक्त सहभागातून स्वच्छता अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली.