ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी आनंदाची बातमी! NCMC स्मार्ट कार्डसाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
महाराष्ट्र वाणी
मुंबई दि ३० :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. एसटी प्रवासातील शासकीय सवलतींचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्ड सक्तीच्या अंमलबजावणीला आता १ सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय जाहीर केला. अनेक पात्र प्रवाशांनी स्मार्ट कार्डसाठी अर्ज करूनही त्यांना अद्याप कार्ड प्राप्त झालेले नसल्यामुळे सवलतीपासून वंचित राहण्याची शक्यता होती. ही गैरसोय टाळण्यासाठी शासनाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य शासनाकडून अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, तर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत दिली जाते. या सवलतींची प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
पूर्वी हा नियम १ ऑगस्ट २०२६ पासून लागू होणार होता. मात्र, मोठ्या प्रमाणावर अर्जदारांना कार्ड वितरित न झाल्याने शासनाने त्याच्या अंमलबजावणीस १ सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
परिवहन विभागाने पात्र नागरिकांना या वाढीव कालावधीत स्मार्ट कार्डची नोंदणी व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून भविष्यात एसटी प्रवासातील शासकीय सवलतींचा लाभ कोणत्याही अडचणीशिवाय मिळू शकेल.