विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी 'बंटी पाटील'चं नाव आघाडीवर? अंबादास दानवेंनंतर नेतृत्वासाठी काँग्रेस सज्ज

महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई दि १७ जुलै :- विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ नुकताच पार पडला आहे. त्यांच्या कार्यकाळाची मुदत ऑगस्ट २०२५ मध्ये संपत असून, आता त्यांच्या जागी नव्या विरोधी पक्षनेत्याची निवड महत्त्वाची ठरणार आहे. महाविकास आघाडीत यासंदर्भात चर्चेला वेग आला असून, पुढील नेता कोण, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
दानवेंची राजकीय वाटचाल आणि ठाकरेंचा विश्वास
२०१९ मध्ये विधानपरिषदेवर निवडून आलेल्या अंबादास दानवे यांनी २०२२ पासून विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळली. शिवसेनेत फूट पडली असताना त्यांनी ठाकरेंच्या गटाचा आक्रमक आवाज बनून भूमिका मांडली. विरोधात असूनही अभ्यासपूर्ण आणि ठाम भाषणं करत त्यांनी आपली छाप सोडली.
पुन्हा विधानपरिषदेवर येणं दानवेंसाठी कठीण?
दानवे स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून आले होते. मात्र, त्या निवडणुका अद्याप झालेल्या नसल्याने त्यांना परत विधानपरिषदेत पाठवणं शक्य नाही. विधानसभा सदस्यांद्वारे निवडही अशक्यप्राय वाटते कारण ठाकरे गटाकडे आवश्यक संख्याबळ नाही. त्यामुळे दानवेंना काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस आघाडीवर, सतेज पाटील चर्चेत
मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीत आता विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे तर विधानपरिषदेतील पद काँग्रेसकडे देण्याचा विचार आहे. अशा स्थितीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांचं नाव पुढे येत आहे. गृह, वाहतूक, माहिती तंत्रज्ञान आदी खात्यांचा अनुभव असलेल्या बंटी पाटील यांचं व्यक्तिमत्त्व संयमी असूनही आक्रमक राजकारणासाठी ओळखलं जातं.
सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा ठरवणार समीकरण
मात्र, विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा करताना सत्ताधाऱ्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. जसे की, आजतागायत भास्कर जाधवांच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर सरकारने निर्णय दिलेला नाही, तसेच विधानपरिषदेतही सत्ताधाऱ्यांकडून कोणता पवित्रा घेतला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
पुढील काही दिवसांत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठीचा निर्णय महाविकास आघाडीच्या एकजुटीची आणि सत्ताधाऱ्यांच्या भूमिका स्पष्ट करणारी कसोटी ठरणार आहे.
अधिक अपडेटसाठी वाचा – महाराष्ट्रवाणी!