"नगराध्यक्षानंतर थेट जिल्हा परिषद! सत्तारांचे धाकटे चिरंजीव अब्दुल आमेर मैदानात"
महाराष्ट्र वाणी
सिल्लोड (प्रतिनिधी) दि १९ :- तालुक्याच्या राजकारणात पुन्हा एकदा सत्तार कुटुंब केंद्रस्थानी आले आहे. नगराध्यक्षपदी आ. अब्दुल सत्तार यांचे थोरले पुत्र अब्दुल समीर यांचा सलग विजय झाल्यानंतर आता त्यांचे धाकटे पुत्र अब्दुल आमेर हेही थेट निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. अंभई जिल्हा परिषद गटातून शिंदेसेनेकडून ते उमेदवारी करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
याच गटात पंचायत समिती गणातून रंजना ताई नगरे आणि केळगाव गणातुन अर्चना अरविंद शिंदे यांनाही उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सिल्लोड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मोठी राजकीय चुरस पाहायला मिळणार आहे.
आ. अब्दुल सत्तार यांनी १९८४ साली ग्रामपंचायत सदस्य म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. पुढे नगराध्यक्ष, आमदार आणि मंत्री अशी त्यांची वाटचाल राहिली आहे. त्यांच्या पत्नी नफीसा बेगम यांनी २००१ ते २०१६ या काळात तब्बल १६ वर्षे नगराध्यक्षपद भूषवले. २०१७ मध्ये थोरले पुत्र अब्दुल समीर नगराध्यक्ष झाले आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा विजयाची पुनरावृत्ती केली.
आतापर्यंत सक्रिय राजकारणापासून दूर राहिलेले अब्दुल आमेर आता थेट निवडणूक रणांगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. शैक्षणिक संस्था, सूतगिरणी व इतर उद्योगांची जबाबदारी सांभाळणारे अब्दुल आमेर यांच्या एन्ट्रीमुळे सिल्लोड तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
👉 सिल्लोडच्या राजकारणात हा नवा अध्याय कोणता कौल देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे!