‘लाडकी बहीण’ योजनेत मोठा बदल: एकाच कुटुंबातील दोनच महिलांना लाभ, अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांची पडताळणी सुरू!

‘लाडकी बहीण’ योजनेत मोठा बदल: एकाच कुटुंबातील दोनच महिलांना लाभ, अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांची पडताळणी सुरू!
‘लाडकी बहीण’ योजनेत मोठा बदल: एकाच कुटुंबातील दोनच महिलांना लाभ, अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांची पडताळणी सुरू!

महाराष्ट्र वाणी न्युज 

सोलापूर दि २१ जुलै :- मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभात आता मोठा बदल करण्यात आला आहे. योजनेच्या अटींचे उल्लंघन करून एका कुटुंबातील तीन ते चार महिलांनी अर्ज केले होते. काहींनी वेगवेगळी रेशनकार्डे दाखवली, तर काहींनी वय व उत्पन्नाची चुकीची माहिती दिली. त्यामुळे आता शासनाने कडक भूमिका घेत, दोनपेक्षा अधिक अर्ज करणाऱ्या महिलांचा लाभ थांबवला आहे. त्यांच्या नावासमोर ‘FSC Multiple in Family’ असा शेरा नोंदवण्यात आला आहे. तसेच ऑगस्टपासून उत्पन्नाची अडीच लाखांच्या वर असलेल्या अर्जदारांची सखोल पडताळणी केली जाणार आहे.

या योजनेसाठी राज्यभरातून २ कोटी ५७ लाख महिलांनी अर्ज केले आहेत. १८ ते ६५ वयोगटातील महिलाच पात्र ठरणार असून, त्यासाठी उत्पन्न मर्यादा अडीच लाखांपर्यंत असावी, कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावे, व लाभार्थीने इतर कोणतीही वैयक्तिक सरकारी योजना घेतलेली नसावी, हे निकष लागू आहेत. मात्र, अनेक अर्जदारांनी ही माहिती चुकीची दिली असून त्याबाबत प्राप्तिकर विभागाने माहिती महिला व बालविकास विभागाला दिली आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अशा अपात्र महिलांचा लाभ बंद करण्यात आला असून काहीजणी आता संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज करत आहेत. विशेष म्हणजे, वयाची ६५ वर्षे पूर्ण झालेल्या, चारचाकी वाहनधारक व इतर योजनांचे लाभार्थी असलेल्या महिलांचा लाभ थांबवण्यात आला आहे.

लाभ बंद झालेल्या महिलांमध्ये या गटांचा समावेश

वयाची ६५ वर्षे पूर्ण झालेल्या

स्वत:कडे किंवा कुटुंबाकडे चारचाकी वाहन असलेल्या

संजय गांधी निराधार योजनेसह इतर योजनेचे लाभार्थी

अठरा वर्षे पूर्ण नसताना अर्ज केलेल्या

तक्रार नोंदविण्याची सोय :

ज्या महिलांचा लाभ थांबवण्यात आला आहे, त्या ‘लाडकी बहीण’ योजनेच्या अधिकृत वेबसाइटवरील ‘Grievance’ या पर्यायातून ऑनलाईन तक्रार करू शकतात. यासाठी अर्जदारांनी स्वतःचा लॉगिन आयडी तयार करावा लागेल. तसेच, तालुकास्तरावरील महिला व बालविकास प्रकल्प कार्यालयात ऑफलाइन अर्जही देता येईल. आतापर्यंत अशा तक्रारींची संख्या दहा लाखांहून अधिक झाली आहे.

अधिकाऱ्यांचे मत :

"निकषांनुसार लाभ बंद करण्यात आला आहे. ६५ वर्षांवरील महिलांचा लाभ आपोआप थांबतो. एकाच कुटुंबातील अधिक महिलांचे अर्ज असतील तर त्यांच्या नावासमोर ‘FSC Multiple in Family’, ‘RTO Rejected’ किंवा ‘Other Scheme Beneficiary’ असे उल्लेख केले जात आहेत."

– रमेश काटकर, महिला व बालविकास अधिकारी, सोलापूर

 शेवटी एवढंच म्हणू – लाभ हवा असेल, तर निकष पूर्ण करायलाच हवेत!