भरधाव कारचा कहर : मंदीरासमोर ६ जणांना उडवलं, २ जणांचा जागीच मृत्यू; शहरात संतापाची लाट

महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर, दि. ४ जुलै : शहरातील सिडको परिसरात आज सकाळी काळा गणपती मंदिरासमोर एक हृदयद्रावक घटना घडली. भरधाव वेगात असलेल्या स्विफ्ट डिझायर कारने सहा पादचाऱ्यांना उडवले. या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने शहरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मृतांमध्ये मंदिराचे सुरक्षा रक्षक गुणाजी लक्ष्मणराव शेवाळे (वय ६०, रा. विठ्ठल नगर, एन-२) यांचा समावेश आहे. दुसऱ्या मृत व्यक्तीची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. अपघातात जखमी झालेल्यांमध्ये विकास समधाने (वय ५०), मनिषा समधाने (वय ४०), रविंद्र चौबे (वय ६५) आणि श्रीकांत राडेकर (वय ६९) यांचा समावेश आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून काहींना अधिक उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, प्रशांत एकनाथ मगर (वय ३०, रा. सिडको) हा तरुण टेनिस खेळून गारखेडा क्रीडा संकुलातून परतत असताना त्याच्या ताब्यातील MH-20 HH-0746 क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारचे नियंत्रण सुटले. मंदिरासमोर वळण घेताना भरधाव वेगाने कार थेट पादचाऱ्यांच्या गर्दीत घुसली.
या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून त्यात एक महिला मंदिराच्या पायऱ्यांवर चप्पल काढत असतानाच भरधाव कार तिच्यावर आदळताना दिसत आहे. इतर पादचाऱ्यांनाही या कारने जबर धडक दिली. परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. रस्त्यावर रक्ताचे थारोळे पसरले होते, अशी भयावह दृश्ये प्रत्यक्षदर्शींनी सांगितली.
घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्रशांत मगर याला ताब्यात घेऊन एमआयडिसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताचं नेमकं कारण पोलीस तपासात उघड होईल, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.
या दुर्दैवी घटनेने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत असून सार्वजनिक ठिकाणी सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
✍️ जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न अनुत्तरितच राहतोय… तुमचं मत काय?