वक्फ बोर्डाच्या सुनावणीत गोंधळ; सामाजिक कार्यकर्ते सलीम मुल्ला यांच्यावर हल्ला, पोलिसात तक्रार

वक्फ बोर्डाच्या सुनावणीत गोंधळ; सामाजिक कार्यकर्ते सलीम मुल्ला यांच्यावर हल्ला, पोलिसात तक्रार

महाराष्ट्र वाणी न्यूज दि २५ जुलै छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)

महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या नियमित सुनावणीदरम्यान पहिल्याच दिवशीच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. हज हाऊस येथे २४ जुलै रोजी झालेल्या या बैठकीदरम्यान सामाजिक कार्यकर्ते आणि वक्फ लिबरेशन अ‍ॅन्ड प्रोटेक्शन टास्क फोर्सचे संस्थापक अध्यक्ष सलीम मुल्ला यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली.

सकाळपासून सुरू असलेल्या प्रकरणांच्या सुनावणीदरम्यान दुपारी सलीम मुल्ला हे पुण्यातून संबंधित प्रकरणासाठी आले होते. ते हॉलमध्ये प्रवेश करत असताना काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्याशी वाद घालत तोंडावर चापट मारली, त्यामुळे त्यांच्या नाकातून रक्त वाहू लागले. या गोंधळात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.

घटनेनंतर वक्फ बोर्डाचे चेअरमन समीर काझी यांनी सलीम मुल्ला यांना आत बोलावून संपूर्ण माहिती घेतली. अज्ञात व्यक्तींविरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, वक्फ बोर्डही संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या घटनेवरून राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, वक्फ मालमत्तेसाठी लढा देणाऱ्या सलीम मुल्ला यांना झालेल्या मारहाणीचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे.

दरमहा वक्फ बोर्डाच्या नियमित सुनावण्या घेण्याचा निर्णय नुकताच समीर काझी यांनी घेतला आहे. मात्र पहिल्याच बैठकीत निर्माण झालेल्या वादामुळे संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या संपूर्ण प्रकरणावर चेअरमन काझी यांनी सध्या कोणतेही भाष्य टाळले असून, दिनांक २५ जुलै रोजी पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 बातमीला वाचा दिली तर वक्फ व्यवस्थेतील पारदर्शकतेच्या लढ्यालाही बळ मिळेल!