टीबीमुक्त भारत अभियान लोकांपर्यंत पोहोचवा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
डॉक्टरांनी शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य विषयक जाणीवजागृती करावी

महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.१७ :- भारत सरकारच्या ‘टीबीमुक्त भारत’ या महत्त्वाकांक्षी अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत विविध उपाययोजना राबविण्यात याव्या. डॉक्टरांनी शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य विषयक जाणीवजागृती करावी. तसेच गावागावात जाऊन टीबीमुक्त भारत हे अभियान लोकांपर्यंत पोहोचवावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज आरोग्य यंत्रणेला दिले.
जिल्हास्तरीय टीबी फोरम बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित हे दुरदृष्य प्रणालीद्वारे तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धनोरकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वैशाली डकले-पाटील, सर्व तालुका आरोग्य अधिकारी आणि विविध अशासकीय संस्था प्रतिनिधी उपस्थित होते.
*टीबी मुक्तीसाठी व्यापक मोहीम*
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये टीबी संशयित रुग्णांची शोध मोहीम, पोषणसहाय्य, घरगुती संपर्क तपासणी, व प्रतिबंधात्मक उपचार (TPT) याबाबत केलेल्या कामगिरीची माहिती देण्यात आली.
सक्रिय तपासणी : जिल्ह्यातील २९ लाख लोकसंख्येच्या तुलनेत ४ लाख ३५ हजार संशयित रुग्ण म्हणून तपासणी करण्यात आली असून १००२ नवीन टीबी रुग्णांची नोंद झाली.
रुग्णांचे व्यवस्थापन : ८६% प्रकरणांमध्ये सहव्याधी (HIV/Diabetes) तपासणी पूर्ण झाली असून ८३% रुग्णांना PMTBMBA अंतर्गत पोषणकिट्स व समुदाय सहाय्य देण्यात आले आहे.
TPT उपचार : २,२८७ घरगुती संपर्कांपैकी ८५४ रुग्णांना TPT उपचार सुरु करण्यात आले आहेत.
*सामाजिक उत्तरदायित्व निधीद्वारे संस्थांचा सहभाग*
जिल्ह्यातील खाजगी संस्थांचा सहभाग देखील उल्लेखनीय ठरला. Lupin Pharma आणि Humana NGO यांच्या माध्यमातून सुमारे ३०० रुग्णांना कोरडा पोषण आहार पुरवण्यात आला. याशिवाय ‘निक्षय मित्र’ उपक्रमांतर्गत १६३ स्वयंसेवकांनी १४७८ रुग्णांच्या उपचारांसाठी पुढाकार घेतला आहे.
*सुविधा व यंत्रसामग्रीसाठी प्रस्ताव*
जिल्ह्यातील अजिंठा, सोयगाव, खुलताबाद, देवगाव रंगारी आणि पैठण येथील आरोग्य संस्थांमध्ये Truenaat यंत्रांची आवश्यकता आहे. यासाठी सुमारे ६० लाख रुपयांची तरतूद मागविण्यात आली आहे. तसेच १५ नवीन सूक्ष्मदर्शक यंत्रांसाठी १३ लाख ६० हजार रुपयांचा प्रस्तावही सादर करण्यात आला आहे, अशी माहिती डॉ. श्रीमती डकले –पाटील यांनी दिली.
*जनजागृतीवर भर*
टीबीविषयी जागरूकता निर्माण करणे, रुग्णांसाठी उपलब्ध सेवांचा प्रचार करणे आणि स्थानिक पातळीवर गृहीत धरलेल्या अडचणी दूर करण्यासाठी दर सहा महिन्यांनी टीबी फोरमच्या बैठका आयोजित केल्या जातील. शासन, नागरी संस्था, मीडिया, वैद्यकीय क्षेत्र आणि स्वयंसेवी संस्था यांचा यामध्ये सक्रीय सहभाग घेण्यात येईल. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या समन्वयातून जिल्ह्यात ‘टीबीमुक्त भारत’ हे ध्येय साध्य करण्यासाठी अधिक सर्वसमावेशक व गतिमान प्रयत्न व्हावे,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले. तसेच लोकांनी आपल्या कुटुंबातील संशयित टीबीरुग्णाची तपासणी करुन घ्यावी व निदान झाल्यास उपचार पूर्ण करुन घ्यावे. हे उपचार विनामूल्य असतात,असे आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले.