शिक्षकांच्या संघर्षाला यश! सरकारने मान्य केल्या सर्व मागण्या; १८ जुलै रोजी खात्यात पगार
चार दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेलं आंदोलन अखेर यशस्वी ठरलं

महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई, दि. ९ जुलै – विनाअनुदानित शिक्षकांच्या मागण्यांसाठी गेल्या चार दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेलं आंदोलन अखेर यशस्वी ठरलं आहे. सरकारने सर्व मागण्या मान्य करत लवकरच पगार थेट खात्यात जमा होणार असल्याची ग्वाही दिली आहे.
राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी येऊन शिक्षकांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारकडून सर्व मागण्या मान्य झाल्याची औपचारिक घोषणा केली.
सरकारने काय दिलं आश्वासन?
महाजन म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारला शिक्षकांची स्थिती आणि मागण्या पूर्णपणे समजून आहेत. टप्प्याटप्प्याने दिलेलं अनुदान काही आर्थिक अडचणींमुळे थांबलं होतं, मात्र आता तुमच्या खात्यात पगार जमा करायचाच आहे, असा ठाम निर्णय झालाय."
ते पुढे म्हणाले की, "आता सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करून अधिवेशन संपल्यानंतर म्हणजेच १८ जुलै रोजी तुमच्या बँक खात्यात पगार जमा होईल. यामध्ये कोणताही विलंब अथवा बदल होणार नाही."
मागण्या काय होत्या?
ऑक्टोबर २०२४ मध्ये टप्पा अनुदान लागू करण्याची घोषणा
प्रत्यक्ष निधी वितरित न झाल्यामुळे आंदोलनाची ठिणगी
पुरवणी मागणी न सादर केल्याने सरकारवर टीका
तिसऱ्या अधिवेशनातही शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित
या पार्श्वभूमीवर राज्यभरातून शिक्षकांनी मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू केलं होतं. अखेर, संयम आणि संघर्षाच्या बळावर शिक्षकांना न्याय मिळाला आहे.
शेवटी शिक्षणाच्या मंदिरातील दिवे पुन्हा उजळणार – आता शिक्षकांच्या हक्काचा पगार त्यांच्या हाती येणार
("जनतेच्या आवाजाला शब्द... ‘महाराष्ट्र वाणी’सोबत जोडा तुमचा संवाद.")