वक्फ मंडळात १२०० कोटींचा जमीन गैरव्यवहार? – इम्तियाज जलील यांची सीबीआय चौकशीची जोरदार मागणी

महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), २३ जुलै :- महाराष्ट्र वक्फ मंडळाने पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील बाणेर येथील तब्बल १२०० कोटी रुपये किमतीच्या वक्फ मालमत्तेचा वादग्रस्त व्यवहार पुन्हा उघडकीस आला आहे. यासंदर्भात एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी थेट सीबीआयमार्फत चौकशीची मागणी केली आहे.
या प्रकरणात वक्फ मंडळाने जवळपास १८ एकर १४ गुंठे जमीन अवघ्या ९ कोटी रुपयांत एका संस्थेस विक्रीस मान्यता दिली होती. विक्रीच्या अटींनुसार ७ कोटी रुपयांची रक्कम २००९ पर्यंत जमा व्हायची होती, मात्र ती रक्कम न भरल्याने त्यावेळच्या मंडळाने व्यवहार रद्द केला होता.
मात्र, दिनांक २७ मे २०२५ रोजी वक्फ मंडळाचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सय्यद जुनेद यांनी अचानकपणे पुन्हा एकदा या व्यवहाराला वैध ठरवून संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांना पत्र पाठवले. त्या पत्रात, वादग्रस्त मालमत्तेची नोंद संबधित संस्थेच्या नावावर करण्यास हरकत नसल्याचे नमूद करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, बाणेर येथील वक्फ मालमत्ता ‘पॅनासिया हिल को-ऑप हाउसिंग सोसायटी’च्या नावे करण्याचा आदेश २००६ साली दिला गेला होता. नोंदणीही २००९ मध्ये झाली होती, मात्र व्यवहार रद्द झाल्यानंतरही आता त्याला वैधता दिल्याने संदेह बळावले आहेत.
वक्फ मालमत्ता ही ‘इनाम वर्ग-३’ प्रकारात मोडते, आणि अशा जमिनींच्या हस्तांतरणासाठी विशेष परवानगी आवश्यक असते. परंतु मंडळाच्या पत्रात, अशा परवानग्या व प्रक्रियेबाबत दुर्लक्ष झाल्याचे दिसते. या व्यवहारात नियमबाह्य बाबींची शक्यता लक्षात घेता अनेक राजकीय पक्षांनी संताप व्यक्त केला आहे.
या प्रकरणात वक्फ मंडळाचे अधिकारी जुनेद यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
खासदार इम्तियाज जलील यांनी या संपूर्ण व्यवहाराची सीबीआय किंवा इतर स्वायत्त तपास यंत्रणेमार्फत चौकशी करून सत्य जनतेसमोर आणण्याची मागणी केली आहे.
वक्फ संपत्तीच्या संरक्षणासाठी पारदर्शक आणि कठोर तपास हाच एकमेव मार्ग...!