२४ जुलै रोजी प्रहारचा ‘चक्काजाम’; बच्चू कडूंसोबत इम्तियाज जलील व कल्याण काळेही सहभागी होणार

२४ जुलै रोजी प्रहारचा ‘चक्काजाम’; बच्चू कडूंसोबत इम्तियाज जलील व कल्याण काळेही सहभागी होणार

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. २३ :– प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी सरकारकडून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलनाची हाक दिली आहे. हे आंदोलन २४ जुलै २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी ११ वाजता होणार असून, या आंदोलनात माजी खासदार इम्तियाज जलील आणि काँग्रेसचे खासदार कल्याण काळे सहभागी होणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह ७/१२ कोरे करण्याचे, दिव्यांगांचे मानधन वाढवण्याचे, विधवा माता, मेंढपाळ व इतर समाजघटकांसाठी विविध योजना राबवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेत आल्यानंतर सरकारने या आश्वासनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत बच्चू कडूंनी यापूर्वी संत तुकडोजी महाराज समाधीस्थळी अन्नत्याग आंदोलन केले होते.

यानंतर त्यांनी '७/१२ कोरा कोरा कोरा' यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण केला असता, सरकारने काही प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद दिला. दिव्यांगांच्या मानधनात १००० रुपयांची वाढ केली आणि उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले. मात्र, अजूनही इतर महत्त्वाच्या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष सुरूच असल्याने बच्चूभाऊंनी महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन पुकारले आहे.

मराठवाडा आणि विदर्भात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू हे छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून, अमरप्रित हॉटेलसमोर, दूध डेअरी चौक, जालना रोड येथे आंदोलनात सहभागी होतील.

या आंदोलनात शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, कामगार, विधवा माता, मेंढपाळ यांच्यासह सर्व सामान्य जनतेच्या मागण्यांचा समावेश आहे. यासाठी कोणताही पक्ष, जात, धर्म न पाहता सर्वांनी एकत्र येऊन मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे शहरप्रमुख कुणाल राऊत, जिल्हाप्रमुख सुधाकर शिंदे, दिव्यांग आघाडीचे जिल्हा प्रमुख शिवाजी गाडे, शहर प्रमुख दत्ता साळकर, मुकबधीर संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन गवई, युवा जिल्हाध्यक्ष कृष्णा गाडेकर आणि शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल पालोदे यांनी केले आहे.

🔻 जनतेच्या हक्कासाठी पुन्हा एकदा रस्त्यावर... चला, चक्काजामला पाठिंबा देऊया!