रेशन दुकानदार संघटनेचं निवेदन – ई-केवायसी, ऑनलाईन मशीन आणि प्रलंबित प्रकरणांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी

रेशन दुकानदार संघटनेचं निवेदन – ई-केवायसी, ऑनलाईन मशीन आणि प्रलंबित प्रकरणांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी
रेशन दुकानदार संघटनेचं निवेदन – ई-केवायसी, ऑनलाईन मशीन आणि प्रलंबित प्रकरणांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २३ जुलै :– जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघातर्फे दिनांक २१ रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी राज्याध्यक्ष डि. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात प्रलंबित वाटप कमिशन, प्राधिकार पत्रांचे नूतनीकरण, मयत दुकानदारांच्या वारसांची प्रकरणे तहसील कार्यालयात रखडल्याने होत असलेले त्रास, तसेच चिरीमिरीचे प्रकार याबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. या समस्यांबाबत अधिकाऱ्यांकडून स्पष्ट आणि सहानुभूतीपूर्ण निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

तसेच लहान मुलांच्या बाबतीत येणाऱ्या ई-केवायसी संबंधित त्रुटी, डाटा एंट्रीतील चुका आणि ऑनलाईन वितरण यंत्रणेमध्ये सातत्याने निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणी यावरही निवेदनात सविस्तर भाष्य करण्यात आले. जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी सर्व मुद्दे समजून घेतले असून, योग्य मार्गदर्शन व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

या प्रसंगी सिल्लोड तालुका संघटनेचे अध्यक्ष रफिक शेरखान, उपाध्यक्ष राधेश्याम काका कुलवाल, कन्नडचे सुल्तानभाई, पैठणचे प्रकाश निकाळजे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

– “दुकानदारांच्या हक्कासाठी संघटना ठाम!”