जागतिक प्लास्टिक सर्जरी दिवस छत्रपती संभाजीनगरमध्ये जल्लोषात साजरा – ‘सुश्रुत’ परंपरेचा आधुनिक गौरव!

जागतिक प्लास्टिक सर्जरी दिवस छत्रपती संभाजीनगरमध्ये जल्लोषात साजरा – ‘सुश्रुत’ परंपरेचा आधुनिक गौरव!

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) :– सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील प्लास्टिक सर्जरी विभाग, IMA महाराष्ट्र AMS आणि महाराष्ट्र प्लास्टिक सर्जरी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक प्लास्टिक सर्जरी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे होते. प्रमुख पाहुणे म्हणून बुलढाण्याचे डॉ. कैलास झिने, डॉ. प्रवीण सूर्यवंशी, डॉ. जितेन कुलकर्णी, डॉ. विनोद मुंदडा, डॉ. गायत्री तडवळकर आदींची उपस्थिती होती. ‘हितगुज’ या चर्चासत्रात वैद्यकीय विद्यार्थी व विविध विभागप्रमुखांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विभाग प्रमुख डॉ. उज्वला दहिफळे यांनी प्लास्टिक सर्जरीबाबत समाजात असलेल्या गैरसमज दूर करत सांगितले की, “ही शाखा केवळ सौंदर्य बदलासाठी नसून वैज्ञानिक आणि पुनर्निर्माणक्षम आहे. 'प्लास्टिकोस' या ग्रीक शब्दाचा अर्थच आहे – ‘आकार देणे’.”

अधिष्ठाता डॉ. सुक्रे यांनी सांगितले की, “सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आता संपूर्ण मराठवाडा आणि खानदेशातील रुग्णांसाठी एक विश्वासार्ह केंद्र बनले आहे. कोणतीही गोष्ट रुग्णसेवेसाठी अपुरी पडू दिली जाणार नाही.”

डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांनी सुश्रुत यांच्या कार्याची माहिती दिली आणि असेच चर्चासत्र वैद्यकीय विद्यार्थ्यांना घडवत असल्याचे नमूद केले. तर, डॉ. जितेन कुलकर्णी यांनी विविध रुग्णांवरील शस्त्रक्रियांचे व्हिज्युअल सादरीकरण करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. रमाकांत बेंबडे, डॉ. मंगेश तांदळे, डॉ. राम चिलगर, डॉ. अनुराधा पाटील, डॉ. अमित पाटील, डॉ. मयूर गोकलानी, डॉ. आशिष कासट, डॉ. चैतन्य पाटील, डॉ. तायडे, डॉ. सचिन जंगले, डॉ. जाकीर मोमीन, डॉ. व्यंकटेश कुलकर्णी, डॉ. अभिजीत गजभरे, डॉ. राजा, डॉ. गुरमीत सिंग यांचे विशेष सहकार्य लाभले.

कार्यक्रमाच्या समारोपाला डॉ. वैशाली उणे यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

🎗️ ‘शरीराला नवसंजीवनी देणाऱ्या शस्त्रक्रियेचं हे वैज्ञानिक आणि सेवाभावी स्वरूप… प्लास्टिक सर्जरी दिवसाने दिली नवचेतना!’