मनपा एक्शन मोडमध्ये! सोमवारपासून हर्सूल–दिल्ली गेट मार्गावर धडक कारवाई
आज शरणापूर फाटा ते पडेगावदरम्यान २७२ अतिक्रमणे जमीनदोस्त
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)दि. ४ जुलै :- छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेला आज मोठं यश मिळालं. शरणापूर फाटा ते पडेगाव दरम्यान तब्बल २७२ अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. या मोहिमेत हॉटेल, लॉज, दुकाने, शेड, कंपाउंड, जाहिरात फलक, गॅरेज, वॉशिंग सेंटर यांचा समावेश होता.
आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या आदेशावरून, अतिक्रमण विभागाचे नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. यामध्ये ६०० अधिकाऱ्यांचा सहभाग, तर २५ जेसीबी, १५ टिप्पर, २ अग्निशमन बंब, २ रूग्णवाहिका आणि इतर यंत्रसामग्रीचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला.
🙌 लोकांचा सहभागही कौतुकास्पद
पडेगाव परिसरातील बाबूलाल गंगाधर महापुरे यांचे घरही या कारवाईत पाडण्यात आले. मात्र त्यांनी कोणताही विरोध न करता महापालिकेला सहकार्य केलं. त्यांच्या या सकारात्मक भूमिकेचा गौरव करत आयुक्त श्रीकांत यांनी त्यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला.
🔁 पुन्हा कारवाई सुरू – सोमवारपासून पुढचा टप्पा
शनिवार व रविवार या दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारपासून पुन्हा कारवाई होणार आहे. यावेळी सिडको बसस्टॅंड ते हर्सूल टी पॉइंट, आणि हर्सूल टी पॉइंट ते दिल्ली गेट मार्गांवर अतिक्रमण हटविण्यात येणार आहे.
"नागरिकांनी स्वखुशीने अतिक्रमण काढावे व महापालिकेस सहकार्य करावे," असं आवाहन आयुक्त श्रीकांत यांनी केलं आहे.
महापालिकेची कारवाई जोरात – आता कुठेही अनधिकृत बांधकाम थांबणार नाही!
(ताज्या घडामोडींसाठी आमच्याशी जोडलेले राहा.)