अल्पसंख्याक समाजाच्या हितासाठी आमदार सना मलीक शेख यांची मंत्रालयात विशेष बैठक; अनेक महत्त्वाच्या मागण्यांवर चर्चा
महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई, दि. २४ जुलै :- अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबवण्याच्या उद्देशाने आज मंत्रालयात आमदार सना मलीक शेख यांच्या पुढाकाराने एक विशेष बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्याक मंत्री दत्तामामा भरणे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री नवाब मलिक तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत आमदार सना मलीक शेख यांनी खालील महत्त्वाच्या विषयांवर ठामपणे मुद्दे मांडले :
MARTI (Minority Research & Training Institute) संदर्भातील प्रलंबित बाबींवर लक्ष वेधले
मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ यामार्फत व्याजमुक्त कर्ज योजना तत्काळ सुरू करण्याची मागणी
मराठवाड्यात युनानी हकीम पदभरती त्वरीत सुरू करावी, अशी विनंती
अल्पसंख्याक मुलींसाठी स्वतंत्र महाविद्यालय स्थापनेसाठी विशेष प्रस्ताव मांडला
अल्पसंख्याक विकास विभागातील प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा
अणुशक्तीनगर, मुंबई येथे क्रीडा संकुल उभारणी संदर्भात विशेष प्रस्ताव सादर
या बैठकीनंतर आमदार सना मलीक शेख यांनी सांगितले की, "अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि अणुशक्तीनगर परिसरात दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी माझा पाठपुरावा सातत्याने सुरू राहील."
अल्पसंख्याक हिताचे प्रश्न मंत्रालयाच्या पातळीवर प्रभावीपणे मांडण्याची भूमिका आमदार सना मलीक शेख यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.