माजी सरपंचाचा भरदिवसा खून — २४ तासांत सर्व आरोपी जेरबंद! स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई
या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली होती
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)दि १३ जुलै :– मौजे सिरसगाव, कन्नड येथील माजी सरपंच राजाराम ऊर्फ राजू भावसिंग चुंगडे (वय ४७) यांचा भरदिवसा निर्घृण खून करण्यात आला. घटनास्थळीच मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासांत तीनही आरोपींना शोधून काढत जेरबंद केले.
ही घटना दिनांक १२ जुलै २०२५ रोजी सायंकाळी सिरसगाव–वैजापूर रोडलगतच्या शेतात घडली. राजाराम चुंगडे हे त्यांच्या शेतात बसले असताना तीन हल्लेखोरांनी पाठीमागून येत धारदार कोयत्याने सात ते आठ वार करत जागीच ठार केले. मारेकरी दुचाकीवरून फरार झाले. याप्रकरणी मृताचे चिरंजीव सूरज चुंगडे यांच्या तक्रारीवरून कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला गती देण्याचे आदेश दिले. पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली स्था. गु. शा. पथकाने आरोपींचा शोध सुरू केला.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आनंद अमर राजपूत (वय २५, रा. सिरसगाव) यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितलेल्या माहितीनुसार उर्वरित दोन आरोपी – समीर समद कुरेशी (वय २०) आणि इरफान शकील शहा (वय २०) – हे श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर येथे लपून बसले असल्याचे समजले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना तेथून ताब्यात घेतले.
तिघांनीही जुन्या वैमनस्यातून, मारहाणीचा राग आणि कब्रस्तान वादातील मदत न केल्याचा राग मनात धरून हा खून केल्याची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे, यातील दोन आरोपी वेगवेगळ्या गुन्ह्यांप्रकरणी यापूर्वीही फरार होते.
या यशस्वी कारवाईत पोलिस अधीक्षक डॉ. राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत, स.पो.नि. संतोष मिसळे, पवन इंगळे, रामचंद्र पवार, व त्यांच्या पथकाने महत्वाची भूमिका बजावली.