राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ची जिल्हा आढावा बैठक उत्साहात संपन्न – पडळकरांच्या वक्तव्याचा जोडे मारून निषेध
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २१ जुलै :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट)ची जिल्हा आढावा बैठक आज राष्ट्रवादी भवन, हडको येथे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत नवनियुक्त प्रदेशाध्यक्षांच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला. सर्व पदाधिकाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करत पक्षबांधणीबाबत निर्धार व्यक्त केला.
बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत तसेच पक्ष संघटनेच्या आगामी नियोजनावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे-पाटील यांना त्यांच्या दोन वर्षांच्या कार्यकाळाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. त्यांचे नेतृत्व आणि कार्यसंघटन कौतुकास्पद असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
तसेच काही नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देत पक्ष संघटनेत नवा उत्साह निर्माण करण्यात आला. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी पक्ष नेत्यांवर वेळोवेळी केलेल्या खालच्या पातळीच्या टीकेचा जोरदार निषेध करण्यात आला. त्यांच्या प्रतिमेचा फडशा पाडण्यात आला आणि कार्यकर्त्यांनी जोडे मारून तीव्र नाराजी व्यक्त केली.
या बैठकीस सर्व ज्येष्ठ नेते, तालुकाध्यक्ष, फ्रंटल सेलचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकजूट आणि ताकदीने आगामी निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
🗣️ अजून अपडेट्ससाठी आमच्याशी जुळलेले राहा!