गरजूंना दिलासा: 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'तून उपचारासाठी आर्थिक मदत मिळवण्याची प्रक्रिया जाणून घ्या!

महाराष्ट्र वाणी न्युज
पुणे दि २५ जुलै :- आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांसाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ पुणे जिल्ह्यात मदतीचा विश्वासार्ह आधार ठरतो आहे. जानेवारी ते जून २०२५ या सहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल १,७८५ रुग्णांना या निधीतून १७ कोटी २८ लाख रुपयांची मदत मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
या निधीतून कोणाला आणि कशी मदत मिळते?
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा उद्देश समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना महागड्या व दुर्धर आजारांवरील उपचारासाठी आर्थिक मदत करणे हा आहे. सध्या पुणे जिल्ह्यात ४४५ खासगी आणि शासकीय रुग्णालये या योजनेशी संलग्न आहेत.
मुख्यमंत्री वैद्यकीय समितीच्या शिफारशीनुसार, रुग्णाच्या आजाराच्या प्रकारानुसार २५ हजारांपासून २ लाखांपर्यंतची मदत दिली जाते. यासाठी आता जिल्हास्तरावर स्वतंत्र सहाय्यता निधी कक्ष स्थापन करण्यात आला असून, गरजू नागरिकांना अर्ज करण्यासाठी अधिक सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अर्ज करण्यासाठी काय करावे?
रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाइकांनी खालीलपैकी कुठल्याही मार्गाने अर्ज सादर करू शकतात:
वेबसाईटवरून ऑनलाईन: https://cmrf.maharashtra.gov.in
ई-मेलद्वारे अर्ज: cmrfpune@gmail.com
आवश्यक कागदपत्रांसह ई-मेल: aao.cmrf-mh@gov.in
थेट कक्षात भेट देऊन अर्ज
महत्त्वाचे:
या योजनेअंतर्गत राज्याबाहेरील रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या किंवा उपचार पूर्ण झालेल्या रुग्णांना मदत दिली जात नाही.
कशासाठी मदत दिली जाते?
निधीतून खालील गंभीर आजारांवरील उपचारांसाठी मदत दिली जाते:
हृदयविकार, कर्करोग, मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुस आणि अस्थिमज्जा प्रत्यारोपण, मेंदूशी संबंधित आजार, रस्ते अपघातातील गंभीर जखमा, नवजात बालकांचे आजार, अंतस्थ कर्णरोपण (कोक्लीयर इम्प्लाँट), अस्थिबंधन शस्त्रक्रिया, जळीत व विद्युत अपघात इत्यादी.
मुफ्त अर्ज उपलब्ध:
सर्व अर्ज नि:शुल्क असून, अधिक माहिती जिल्हास्तरीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख डॉ. मानसिंग साबळे यांनी दिली आहे.