डासांच्या नियंत्रणासाठी मनपाची धडक मोहीम; 10 झोनमध्ये 512 ठिकाणी गप्पी मासे सोडले
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २४ :- डेंग्यू, मलेरिया यांसारख्या डासजन्य आजारांना आळा घालण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आरोग्य मलेरिया विभागाने विशेष ‘धडक गप्पी मासे मोहीम’ राबवली. 19 ते 24 ऑगस्टदरम्यान शहरातील सर्व 10 झोनमध्ये ही मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत शहरातील तब्बल 512 ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले. डासांच्या अळ्या खाणारे गप्पी मासे जैविक पद्धतीने डासांची उत्पत्ती नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याने मनपाने या उपाययोजनेवर भर दिला आहे.
महानगरपालिकेचे महापौर समीर राजुरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, विरोधी पक्षनेते समीर साजिद, सभागृह नेते गोविंद केंद्रे, वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती सभापती डॉ. सुनीता सोळुंके, आयुक्त अमोल येडगे आणि अतिरिक्त आयुक्त-2 कल्पिता पिंपळे यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात आली. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. उज्वला भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली, तर जीवशास्त्रवेत्ता तथा साथरोग अधिकारी डॉ. सय्यद सुमैय्या नाज यांच्या अधिपत्याखाली आरोग्य विभागाच्या पथकांनी ही कारवाई केली.
गप्पी मासे डासांच्या अळ्या नष्ट करण्यास मदत करत असल्याने त्यांचा वापर हा डास नियंत्रणासाठी नैसर्गिक आणि प्रभावी उपाय मानला जातो. त्यामुळे डासांची पैदास रोखण्यासाठी मनपाने या जैविक उपाययोजनेला चालना दिली आहे.
दरम्यान, नागरिकांनीही डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी घराच्या परिसरात किंवा सार्वजनिक ठिकाणी पाणी साचू देऊ नये, पाण्याची भांडी आणि साठे नियमितपणे स्वच्छ ठेवावेत, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाने केले आहे.
गप्पी मासे हवे असल्यास नागरिकांनी जवळच्या मनपा आरोग्य केंद्रातील बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांकडे आपले नाव, मोबाईल क्रमांक आणि पत्ता नोंदवावा.
‘डासांची उत्पत्ती रोखा, डेंग्यू-मलेरियाला आळा घाला’ या उद्देशाने मनपा आणि नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नातून शहर अधिक सुरक्षित व निरोगी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.