साखरेच्या दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन; मंत्र्यांना पाठवला रिकामा चहाचा कप आणि साखर
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २४ :- साखरेच्या वाढत्या दराचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने सोमवारी (दि. २४) सिडको पोस्ट ऑफिससमोर अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
आंदोलकांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना पोस्टाद्वारे रिकामा चहाचा कप आणि एक किलो साखर पाठवून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. साखरेच्या वाढलेल्या किमतीचे प्रतीक म्हणून रिकामा चहाचा कप दाखवण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारच्या धोरणांविरोधात नाराजी व्यक्त केली.
साखरेच्या दरवाढीमुळे मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य कुटुंबांच्या दैनंदिन खर्चावर अतिरिक्त भार पडत असल्याचे आंदोलकांनी सांगितले. चहापासून ते सणासुदीच्या विविध पदार्थांपर्यंत साखरेचा वापर होत असल्याने दरवाढीचा परिणाम थेट घरच्या बजेटवर जाणवत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या आंदोलनात प्रदेश सचिव आनंद मगरे, शारुख शेख, तारेख पठाण, प्रकाश इंगळे, आशिष इंगळे, उदय बनसोडे, कुलदीप शिंदे, हर्षल निकम, सिद्धांत गुटिकर, सुरेश दाभाडे, गौरव मोटले, कमलेश नरवडे, समीर कादरी, मिर्झा सोहेल बेग, सौरभ बनकर, आनंद तायडे, आदित्य सदाशिवे, आदित्य कुलकर्णी, ऋतिक लोहाहे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.