ज्वारी-बाजरीच्या पिठात जिवंत कीटक; ‘छप्पन भोग’चा FSSAI परवाना निलंबित
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २१ :- बीड बायपास परिसरातील सातारा भागात असलेल्या ‘छप्पन भोग थाळी रेस्टॉरंट अँड बँक्वेट हॉल’वर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान ग्राहकांसाठी वापरल्या जाणाऱ्या ज्वारी-बाजरीच्या पिठामध्ये जिवंत कीटक आढळल्याचे समोर आले. यासोबतच अन्नपदार्थांच्या साठवणुकीपासून स्वच्छता व्यवस्थेपर्यंत अनेक त्रुटी आढळल्याने रेस्टॉरंटचा FSSAI परवाना निलंबित करण्यात आला.
FDAच्या तपासणीत अन्नसाठवणुकीसाठी आवश्यक FIFO/FEFO पद्धतीचे पालन होत नसल्याचे आढळले. परिसरात अस्वच्छता आणि कीटकांचा वावर असल्याचेही तपासणीत निदर्शनास आले. तसेच पिण्याच्या पाण्याच्या तपासणीची नोंद उपलब्ध नसणे, तयार खाद्यपदार्थांचे प्रयोगशाळा परीक्षण न करणे आणि कच्चा माल पुरवठा करणाऱ्या विक्रेत्यांची आवश्यक माहिती उपलब्ध नसल्याचेही आढळून आले.
याशिवाय खाद्यतेलाच्या वापरावर योग्य देखरेख नसणे, कीटक नियंत्रणाची व्यवस्था अपुरी असणे, स्वच्छतेकडे दुर्लक्ष आणि अन्नपदार्थांचे तापमान मोजणाऱ्या उपकरणांच्या कॅलिब्रेशनबाबतही त्रुटी आढळल्या.
तपासणीतील या बाबी ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर असल्याचे लक्षात घेऊन सहाय्यक आयुक्त द. वि. पाटील यांनी अन्न सुरक्षा कायद्यातील कलम ३२(३) अंतर्गत रेस्टॉरंटचा FSSAI परवाना तात्काळ निलंबित केला.
परवाना निलंबित असताना संबंधित आस्थापनाला कोणत्याही प्रकारचे अन्नपदार्थ तयार करणे, विक्री करणे किंवा त्यांचे वितरण करण्यास मनाई करण्यात आली आहे. FDAच्या या कारवाईमुळे शहरातील खाद्य आस्थापनांमधील अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.