एमडी तस्करीवर पोलिसांचा मोठा घाव! 13.590 ग्रॅम MDसह ₹2.40 लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघे ताब्यात
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २७ :- शहरात अंमली पदार्थांची चोरटी विक्री करणाऱ्यांविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने मोठी कारवाई केली आहे. द्वारकादास शामकुमारसमोरील एमजीएमकडे जाणाऱ्या रस्त्यावर कारवाई करत पोलिसांनी 13 ग्रॅम 590 मिलीग्रॅम वजनाची MD (मेफेड्रोन) पावडर जप्त केली. या कारवाईत दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, MDसह मोबाईल हॅण्डसेट आणि दुचाकी असा एकूण ₹2 लाख 40 हजार 770 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, पोलीस उपनिरीक्षक उत्रेश्वर मुंडे आणि त्यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, शेख सादीक शेख सलीम (वय 27, व्यवसाय मेकॅनिक, रा. बक्कलगुडा, शहागंज) आणि अमान कुरेशी मुश्ताक कुरेशी ऊर्फ चौधरी (वय 25, मटन शॉपमध्ये काम, रा. जिन्सी) हे दोघे MD पावडरची चोरटी विक्री करताना आढळून आले. त्यांच्या ताब्यातून 13.590 ग्रॅम MD, दोन मोबाईल आणि एक दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) शशिकांत सातव, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मजहर सय्यद आणि पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.
नागरिकांनी माहिती देण्याचे आवाहन
शहरात कुठेही अंमली पदार्थांची विक्री, सेवन किंवा नशेखोरी करणाऱ्या टोळ्या आढळून आल्यास तसेच नशेसाठी कोणी जागा उपलब्ध करून देत असल्यास नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी व्हॉट्सॲप क्रमांक 9684702002 वर संदेश पाठवता येणार आहे.