सुट्टे खाद्यतेल विकू नका, घेऊ नका! तुकाराम मुंढेंचा विक्रेत्यांना इशारा; नियम मोडल्यास 7 वर्षांपासून जन्मठेपेपर्यंत शिक्षा
महाराष्ट्र वाणी
मुंबई दि २१ :- दूध, पनीर आणि अन्य खाद्यपदार्थांमधील भेसळीनंतर आता अन्न व औषध प्रशासनाने खाद्यतेलाच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. ‘सेव्ह फूड, सेव्ह ड्रग, सेव्ह महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत खाद्यतेलाच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंतच्या प्रक्रियेची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देताना विक्रेते, उत्पादक तसेच हॉटेल व्यावसायिकांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले.
FDAच्या तपासणीत काही नोंदणी नसलेल्या खाद्यतेल उत्पादकांचा शोध लागला असून, खाद्यतेलात अनधिकृत मिश्रण केल्याचे प्रकारही आढळल्याचे मुंढे यांनी सांगितले. विशेषतः मोहरीच्या तेलात परवानगी नसलेले मिश्रण करणे, मुदत संपलेल्या तेलाचे पुन्हा पॅकिंग करणे यासारख्या बाबी निदर्शनास आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सुट्टे खाद्यतेल विक्रीवर स्पष्ट इशारा
खाद्यतेलाची विक्री सुट्या स्वरूपात करण्यास नियमांनुसार परवानगी नसल्याचे FDAने स्पष्ट केले आहे. त्यामुळे खाद्यतेल केवळ योग्य पॅकेजिंग आणि लेबलसह विकले जावे. किरकोळ विक्रेत्यांनीही सुटे तेल खरेदी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
उत्पादनापासून किरकोळ विक्रीपर्यंत खाद्यतेलाशी संबंधित सर्व आस्थापनांना लागू असलेल्या मानकांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. यामध्ये किराणा दुकानदार तसेच ऑनलाइन माध्यमातून खाद्यतेल विकणाऱ्यांचाही समावेश आहे.
मोहरीच्या तेलात मिश्रणाला मनाई
मोहरीचे तेल विकताना ते शंभर टक्के मोहरीचे तेल म्हणूनच विकावे लागेल. त्यामध्ये अनधिकृतपणे इतर तेलांचे मिश्रण करता येणार नाही. सुट्या तेलाचा स्रोत, उत्पादनाची तारीख आणि गुणवत्ता याबाबत ग्राहकांना अनेकदा पुरेशी माहिती मिळत नाही. त्यामुळे अशा तेलाच्या वापरामुळे आरोग्याचा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा FDAने दिला आहे.
याशिवाय खाद्यतेलाचे जुने टिन किंवा कंटेनर पुन्हा वापरण्याच्या प्रकारावरही प्रशासनाचे लक्ष आहे. वापरलेल्या तेलाचा वारंवार पुनर्वापर करणे टाळण्याचे निर्देश हॉटेल व्यावसायिकांना देण्यात आले आहेत.
तळणीचे तेल वारंवार वापरू नका
हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणी तळणीसाठी वापरलेले तेल पुन्हा पुन्हा वापरले जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. अशा पद्धतीमुळे खाद्यतेलाची गुणवत्ता बिघडून आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तळणीचे तेल वारंवार वापरू नये, असा स्पष्ट इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला.
नियम मोडल्यास कठोर कारवाई
खाद्यतेलासंदर्भातील नियमांचे उल्लंघन, भेसळ किंवा ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आढळल्यास कायद्यानुसार कठोर कारवाई होऊ शकते. काही गंभीर प्रकरणांमध्ये ७ वर्षांपासून आजन्म कारावासापर्यंतची शिक्षा होऊ शकते, तर भेसळीसाठी १० लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असल्याचे मुंढे यांनी सांगितले.
ग्राहकांनी तेल खरेदी करताना काय काळजी घ्यावी?
ग्राहकांनी सुटे खाद्यतेल खरेदी करू नये. पॅकबंद तेल घेताना पॅकेटवरील लेबल, उत्पादन व मुदत समाप्तीची तारीख, सील आणि इतर आवश्यक माहिती तपासावी. घरातही तळणीचे तेल वारंवार वापरणे टाळावे. हॉटेलमध्येही वारंवार वापरलेले तेल वापरले जात असल्याचा संशय असल्यास अशा ठिकाणी खाद्यपदार्थ घेणे टाळावे, असे आवाहन FDAकडून करण्यात आले आहे.
भेसळयुक्त खाद्यतेलाचा प्रश्न केवळ आर्थिक फसवणुकीपुरता मर्यादित नसून त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे खाद्यतेलाच्या गुणवत्तेबाबत उत्पादक, विक्रेते आणि ग्राहकांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.