बेरोजगारांच्या हक्कासाठी NCPचा एल्गार; छत्रपती संभाजीनगरात तिरंगा मोटारसायकल मोर्चा

बेरोजगारांच्या हक्कासाठी NCPचा एल्गार; छत्रपती संभाजीनगरात तिरंगा मोटारसायकल मोर्चा
बेरोजगारांच्या हक्कासाठी NCPचा एल्गार; छत्रपती संभाजीनगरात तिरंगा मोटारसायकल मोर्चा

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २७ :- मराठवाड्यासह राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने छत्रपती संभाजीनगरात ‘बेरोजगार हक्क एल्गार’ तिरंगा मोटारसायकल मोर्चा काढण्यात आला. क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला.

रखडलेल्या शासकीय व निमशासकीय भरती प्रक्रिया, स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार, पेपरफुटी तसेच स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधींपासून डावलले जात असल्याच्या मुद्द्यांवर या आंदोलनातून सरकारचे लक्ष वेधण्यात आले.

मोर्चानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात निवेदन देण्यात आले. यावेळी माजी मंत्री राजेश टोपे, खासदार बजरंग सोनवणे, माजी आमदार संजय वाघचौरे, माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्यासह पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“तरुणांना न्याय मिळावा, रखडलेल्या भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण कराव्यात आणि संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी. तसेच स्थानिक युवकांना रोजगाराच्या पुरेशा संधी मिळाल्या पाहिजेत,” अशी मागणी राजेश टोपे आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

मराठवाड्यातील बेरोजगार तरुणांच्या भवितव्याचा प्रश्न गंभीर असून, त्यांच्या हक्कांसाठी आणि रोजगाराच्या संधींसाठी संघर्ष यापुढेही सुरूच ठेवण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.